Radhakishan Damani Investment In Trent: दलाल स्ट्रीटचे अनुभवी गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांना मंगळवारी मोठा आर्थिक फटका बसला आहे. कारण आज शेअर बाजार सुरू होताच ट्रेंटचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, ज्यामध्ये दमानी यांची मोठी गुंतवणूक आहे. टाटा समूहाची ही रिटेल कंपनी डिसेंबर २०२५ तिमाहीच्या निराशाजनक अहवालामुळे विक्रीच्या दबावाखाली आली आहे.

एनएसईच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्समध्ये ८.३५ टक्क्यांची घसरण झाली आणि सोमवारच्या ४,४२९.८० रुपयांच्या क्लोजिंग प्राइसच्या तुलनेत ते सुरुवातीला ४,०६० रुपयांपर्यंत खाली आले. यामुळे कंपनीचे एकूण बाजार भांडवल १.४५ लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले आहे.

राधाकिशन दमानी यांचा त्यांची गुंतवणूक कंपनी ‘डेराइव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स’च्या माध्यमातून ट्रेंटमध्ये ४३,९८,२०४ इक्विटी शेअर्स म्हणजेच १.२४ टक्के हिस्सा आहे. मात्र, आज झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या हिश्श्यात १६२.६५ कोटी रुपयांची घट झाली. ट्रेंट कंपनीमधील त्यांच्या होल्डिंगचे मूल्य काही मिनिटांतच १,९४८.३२ कोटी रुपयांवरून १,७८५.६७ कोटी रुपयांवर आले आहे.

भारताचे ‘रिटेल किंग’ म्हणून ओळखले जाणारे राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती १७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यांच्या ‘अव्हेन्यू सुपरमार्ट्स’ या सुपरमार्केट चेनच्या विक्रमी आयपीओनंतर दमानी यांना ‘रिटेल किंग’ ही ओळख मिळाली. डीमार्ट या नावाने प्रसिद्ध असलेली ही कंपनी त्यांच्या अनेक फायद्यात असलेल्या कंपन्यांपैकी एक आहे. तसेच, राधाकिशन दमानी यांची व्हीएसटी इंडस्ट्रीज आणि पूर्वी इंडिया सिमेंट्ससारख्या विविध कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे.

ट्रेंटचा तिमाही निकाल

ट्रेंटने तिसऱ्या तिमाहीतील महसुलात वार्षिक १७ टक्के वाढ नोंदवत ५,२२० कोटी रुपये महसूल मिळवला आहे, तर ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठीचा महसूल वार्षिक १८ टक्क्यांनी वाढून १४,६०४ कोटी रुपये झाला आहे. ही वाढ वेस्टसाइड आणि झुडिओ या ब्रँड्सच्या विस्तारामुळे झाली, ज्यामुळे स्टोअरचे जाळे वाढून ८५४ झुडिओ आउटलेट्सपर्यंत पोहोचले आहे, ज्यात संयुक्त अरब अमिरातीमधील चार आउटलेट्स समावेश आहे.

जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने ट्रेंटसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवले असून, प्रति शेअर ५,४५६ रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. या परदेशी गुंतवणूक बँकेने म्हटले आहे की, तिसऱ्या तिमाहीतील महसूल वाढ त्यांच्या अंदाजानुसारच होती, आणि नवीन स्टोअर्सची भर पडण्याची प्रक्रिया देखील अपेक्षेनुसार सुरू आहे.