Trent Share Price Surge : देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सध्या नेतृत्वावरुन संघर्ष सुरू आहे. याचा परिणाम समूहातील कंपन्यांच्या समभागांवरही झालेला पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत ग्रुपमधील रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ट्रेंटचे शेअर एका दिवसात मंगळवारी जवळपास १३ टक्क्यांनी वधारले. ऑगस्ट २०२४ नंतरची कंपनीची ही सर्वात मोठी एका दिवसातील तेजी मानली जात आहे.

ट्रेंटमध्ये अचानक उसळी का आली?

कंपनीने नुकत्याच संपलेल्या सप्टेंबर तिमाहीत उत्तम कामगिरी नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ट्रेंटचा स्वतंत्र महसूल २३ टक्क्यांनी वाढून ५,७८८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पहिल्या सहामाहीत कंपनीचा महसूल २१ टक्क्यांनी वाढून ११,४५४ कोटी रुपयांवर गेला आहे. यामध्ये ‘वेस्टसाईड’ आणि ‘झुडिओ’ या लोकप्रिय ब्रँड्सचा विस्तार गेमचेंजर ठरला. या वर्षात एकूण २५० नवीन स्टोअर्स सुरू केली, तर सप्टेंबर तिमाहीत आणखी २७ नवीन स्टोअर्स जोडण्यात आली. विशेष म्हणजे, यात ‘झुडिओ’ने १,००० स्टोअर्सचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे.

विक्री उत्पादकतेत सुधारणा

वेगाने स्टोअर्सचा विस्तार होत असतानाच कंपनीने प्रति स्टोअर विक्री सुधारण्यात यश मिळवले आहे. गोल्डमन सॅक्स, मॅक्वेरी आणि सिटी यांसारख्या दिग्गज जागतिक ब्रोकरेज कंपन्यांच्या अहवालानुसार, पहिल्या तिमाहीत प्रति स्टोअर महसुलात ५.६ टक्क्यांची घसरण झाली होती, ती दुसऱ्या तिमाहीत सुधारून केवळ १.७ टक्क्यांवर आली आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

तज्ज्ञांच्या मते, ही तेजी केवळ तात्कालिक नसून शेअरमध्ये ट्रेण्ड रिकव्हरीचे संकेत देत आहे. आगामी काळात हा शेअर ३,००० ते ३,२०० रुपयांच्या दिशेने झेप घेऊ शकतो, तर खालच्या बाजूने २,५०० ते २,६०० रुपयांच्या दरम्यान मजबूत सपोर्ट झोन आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. लोसकत्ता ऑनलाईनमध्ये शेअर बाजाराशी संबंधित वृत्त केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केले जाते. याला गुंतवणुकीचा सल्ला समजू नये. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, वाचकांनी पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.