Tukaram Mundhe Action Patanjali Foods Share Price Drop: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या सातत्याने होणाऱ्या बदल्यांमुळे चर्चेत असतात. आपल्या २१ वर्षांपेक्षा जास्त काळाच्या प्रशासकीय सेवेत त्यांच्या कारकिर्दीत तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. मुंढे यांनी आतापर्यंत जिथे कुठे पदभार स्वीकारला, तिथे भ्रष्टाचाराला आणि बेकायदेशीर कामांना थेट सुरुंग लावला. नुकतीच तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागात बदली झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी पहिल्या तीन दिवसांत ५३ धाडी टाकत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला होता.

तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईमध्ये रामदेव बाबा यांच्याशी संबंधित पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांचाही समावेश आहे. ‘औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४’चा भंग केल्याप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा यांच्या उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मे. दिव्य फार्मसी या ‘पतंजली’ ब्रँडअंतर्गत औषधांचे उत्पादन करणाऱ्या नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीची आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा शेअरवर काय परिणाम?

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी २९ मे २०२६ रोजी केलेल्या कारवाईनंतर एनएसई आणि बीएसईवर सुचीबद्ध असलेल्या पतंजलीच्या शेअरवर काय परिणाम झाला, हे पाहूया.

२९ मे ते ४ जून २०२६ या कालावधीत पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये घसरणीचा कल दिसून आला आहे. या शेअरमध्ये सुमारे ४.०९ टक्क्यांची घट झाली आहे. २९ मे रोजी ४५६.२० रुपयांवर बंद झालेला हा शेअर ३ जून २०२६ रोजी बाजार बंद झाला तेव्हा ४४१.६५ रुपयांवर आला होता. आज (४ जून) सकाळी १० वाजेपर्यंत पतंजलीचा शेअर ०.६२ टक्क्यांच्या घसरणीसह ४३८.९० रुपयांवर व्यवहार करत होता.

या कालावधीतील शेअरची कामगिरी

  • २९ मे २०२६: ४५९.८० रुपयांवर उघडला आणि ४५६.२० रुपयांवर बंद झाला.
  • १ जून २०२६: ४५७.४५ रुपयांवर उघडला आणि घसरण होऊन ४४९.२५ रुपयांवर बंद झाला.
  • २ जून २०२६: ४४९.२५ रुपयांवर उघडला आणि ४५१.५५ रुपयांवर बंद झाला.
  • ३ जून २०२६: ४५१.०० रुपयांवर उघडला आणि त्यात मोठी घसरण होऊन तो ४४१.६५ रुपयांवर बंद झाला.

२०२४ मध्येही झाली होती शेअरमध्ये घसरण

सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०२४ रोजी, अनेक आजार कायमस्वरूपी बरे होत असल्याचा दावा करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरूच ठेवल्याबद्दल, योगगुरू रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ या कंपनीला आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांना अवमान नोटीस बजावली होती.

या सुनावणीनंतरच्या दुसऱ्या दिवशी पतंजली फूड्सच्या शेअरच्या किमतीत सुमारे ४ टक्क्यांची घसरण झाली होती, असे वृत्त त्यावेळी लाईव्हमिंटने दिले होत.