Tukaram Mundhe FDA Action Patanjali Stock Impact: तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नभेसळीविरुद्ध मोठी मोहीम उघडली असून, राज्यभरातील ११४ आस्थापनांमधून ९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे.
या कारवाईदरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे संशयास्पद चुकीचे लेबलिंग आणि भेसळीच्या संशयावरून पतंजलीच्या २२७९ लिटर गाईच्या तुपाचा साठा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत २०.२० लाख रुपये इतकी आहे.
जप्त केलेल्या साठ्यामध्ये खाद्यतेल, मसाले, तांदूळ, कडधान्ये, गूळ, गव्हाचे पीठ, बेसन, मैदा, तूप, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, नमकीन, सुका मेवा, आंब्याचा गर, चारोळी, चिया सीड्स, बेकरी उत्पादने आणि हक्का नूडल्स यांचा समावेश आहे.
पतंजली गाईचे तूप
छत्रपती संभाजीनगरमधील सुंदरवाडी येथे पतंजली आयुर्वेदचे सुपर डिस्ट्रिब्युटर असलेल्या ‘मेसर्स दिव्य महावितरक’ या ठिकाणाहून पतंजली गाईचे तूप मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.
एफडीएने दोन बॅचेसमधील एकूण ४०३२ युनिट्स (२२७९ लिटर) तूप जप्त केले. या साठ्याचे मूल्य २० लाख रुपये इतके आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या विविध कलमांच्या अंतर्गत, हे उत्पादन चुकीच्या पद्धतीने लेबल केलेले किंवा भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले असल्याचे विभागाने सांगितले. एफडीएच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासणीत ही उत्पादने कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचे दिसून आले आहे.
पंतजलीच्या शेअरवर काय परिणाम?
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या कारवाईनंतर पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअरवर याचा काय परिणाम होणार, यााबत गुंतवणूकदारांमध्ये चर्चा होता. मात्र, या कावाईचा पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअर्सवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळी बाजार उघडला तेव्हा पतंजलीच्या शेअर्सचा ३७० रुपयांवर व्यवहार सुरू झाला. आतापर्यंतच्या व्यवहारात या शेअरने ३७५ रुपये ही दिवसातील उच्चांकी तर ३६८ रुपये ही नीचांकी पातळी गाठली आहे.
वर्षभरात ३५ टक्क्यांचा तोटा
या शेअरच्या गेल्या ५२ आठवड्यांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, या शेअरची नीचांकी किंमत ३२८.२० रुपये आणि उच्चांकी किंमत ५९४.९५ रुपये इतकी नोंदवली गेली आहे. वार्षिक कामगिरीच्या दृष्टीने पाहता, पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत ३५.६३ टक्क्यांची घट झाली आहे.
पतंजली फूड्स लिमिटेडचे बाजार भांडवल ६६,६२१.४१ कोटी रुपये असून, कंपनीचे P/E गुणोत्तर ११.६६ इतके आहे.
