US Fed Rate Decision impact on Indian share market: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी प्रमुख व्याजदर ३.५ टक्के ते ३.७५ टक्के या श्रेणीत कायम ठेवला. मात्र, हा निर्णय १९९२ नंतरच्या सर्वाधिक तीव्र विरोधानंतर घेण्यात आला. रिझर्व्हने इराणमधील सध्याच्या संघर्षाकडे आर्थिक जोखमीचा एक प्रमुख घटक म्हणून निर्देश केला असून, वाढत्या ऊर्जा (तेल आणि गॅस) किमती आणि भू-राजकीय अनिश्चितता यामुळे आपल्या धोरणात्मक दृष्टिकोनामध्ये गुंतागुंत निर्माण होत असल्याचा इशारा दिला आहे.
फेडची ही बैठक अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या कार्यकाळातील शेवटची बैठक ठरल्यामुळेही तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. ते आता फेडची सूत्रे त्यांचे उत्तराधिकारी केविन वॉर्श यांच्याकडे सोपवणार आहेत.
हा निर्णय बाजाराच्या अपेक्षांशी सुसंगत होता. मात्र, या निर्णयाला झालेला विरोध हा आतापर्यंतच्या सर्वाधिक विरोधांपैकी एक ठरला. १२ पैकी ४ सदस्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला.
भारतीय शेअर बाजारावर याचा कसा परिणाम होऊ शकतो?
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असल्याचे अधोरेखित केले असले, तरी ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेला महागाईचा वाढता धोका त्यांनी प्रकर्षाने मांडला.
नजीकच्या काळातील व्याजदरांच्या वाटचालीबाबत कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नाहीत. कारण मौद्रिक धोरणातील आपली भूमिका निश्चित करण्यासाठी FOMC कडून प्राप्त होणाऱ्या नवीन आर्थिक आकडेवारीचा विचार केला जाईल.
तज्ज्ञांच्या मते, यूएस फेडच्या या धोरणात्मक निर्णयाचा भारतीय शेअर बाजारावर कोणताही लक्षणीय परिणाम होणार नाही.
“फेडच्या निर्णयाचा भारतीय बाजारावर सध्या प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे. ऊर्जेचे संकट असूनही, भारतीय अर्थव्यवस्था आणि बाजार बऱ्यापैकी स्थिर आहेत. पण, जर कच्च्या तेलाचे दर दीर्घकाळापर्यंत उच्च पातळीवर राहिले, तर भारताच्या आर्थिक वाढीस असलेला ‘घटीचा धोका’ (Downside risk) आणि महागाई वाढण्याचा धोका (Upside risk) वाढेल. बाजाराने अद्याप या बाबीचा पुरेसा विचार केलेला नाही”, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही.के. विजयकुमार यांनी म्हटले आहे.
पिरामल समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ देबोपम चौधरी यांनी सांगितले की, बाजारांनी व्याजदरवाढीला विराम मिळण्याची शक्यता आधीच गृहीत धरली होती. त्यामुळे या निर्णयाचा बाजारांवर फारसा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. बाजारांची दिशा प्रामुख्याने भू-राजकीय घडामोडींवरच अवलंबून राहील.
अमेरिकी शेअर बाजारात काय घडले?
‘फेड’च्या धोरणात्मक घोषणेनंतर S&P 500 आणि Nasdaq निर्देशांकांमध्ये किंचित घसरण दिसून आली. तर दुसरीकडे, अमेरिकन डॉलर आणि १०-वर्षीय ट्रेझरी बाँड्सचे उत्पन्न १ टक्क्यांहून अधिक वाढून ४.४२ टक्क्यांवर पोहोचले. पण, बाँड उत्पन्नातील आणि डॉलरच्या मूल्यातील ही वाढ ‘फेड’च्या धोरणात्मक निर्णयापेक्षा, तेलाच्या वाढत्या किमतींमुळेच अधिक झाल्याचे दिसून येते.
