US Stock Market Crash 242 Lakh Crores Loss Details: इंटेल आणि ॲमेझॉनच्या निराशाजनक निकालांमुळे व एआयवरील खर्चाबाबतची चिंता वाढल्याने, शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे प्रमुख निर्देशांक नॅसडॅकमध्ये जूनच्या सुरुवातीपासूनची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, डाऊ निर्देशांक १.०९% घसरून ५१,७७०.३१ अंशांवर, एस अँड पी ५०० निर्देशांक १.८२% घसरून ७,५८०.०७ अंशांवर, तर नॅसडॅक कंपोझिट निर्देशांक २.८६% घसरून २५,४३७.०० अंशांवर बंद झाला. नॅसडॅक आता ६ ऑक्टोबरच्या विक्रमी बंद भावापेक्षा ७.८% खाली आहे. या घसरणीमुळे अमेरिकन गुंतवणूकदारांना एकाच दिवसांत सुमारे २४२.५ लाख कोटी रुपये गमवावेल लागले.

इंटेल आणि ॲमेझॉनमुळे घसरण

इंटेल आणि ॲमेझॉन या दोन प्रमुख कंपन्यांनी गुरुवारी रात्री उशिरा आपले निकाल जाहीर केले होते. मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा वापर झाल्याचे जाहीर केल्यानंतर इंटेलच्या शेअरमध्ये २८.६% ची घसरण झाली, तर दुसरीकडे ॲमेझॉनने आपली घसरण काही प्रमाणात भरून काढली.

ॲमेझॉनची एआयवरील आक्रमक खर्चाची योजना आणि इंटेलने रोख रकमेच्या वापराबाबत दिलेला इशारा, यांमुळे एआय पायाभूत सुविधांचा खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्याच्या कालावधीबद्दलची चिंता अधिकच वाढली आहे.

चिप कंपन्यांना सर्वाधिक फटका

या दरम्यान चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये ४.२% आणि एएमडीच्या शेअर्समध्ये १०.९% घट झाली, तर फिलाडेल्फिया सेमीकंडक्टर निर्देशांक दिवसभरात ७.२% ने घसरला आणि या महिन्यात त्यात १५% पेक्षा जास्त घट झाली आहे. सर्व्हर उत्पादक डेल आणि एचपीच्या शेअर्समध्ये अनुक्रमे १०.८% आणि ९.६% ची घसरण झाली.

अमेरिकन बाजरात भूकंप

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, नॅस्डॅक १०० निर्देशांकासाठी चालू महिना मार्च २०२५ नंतरचा सर्वात वाईट महिना ठरत आहे. एस अँड पी ५०० निर्देशांकातील तंत्रज्ञान क्षेत्राला मार्च २०२५ नंतरचे सर्वात मोठे मासिक नुकसान सोसावे लागले, तर दळणवळण सेवा क्षेत्राचे एप्रिल २०२२ नंतरचे सर्वात मोठे नुकसान झाले.

ऑक्टोबर महिन्यात नॅस्डॅक १०० निर्देशांकातील २ ट्रिलियन डॉलर्सहून अधिक बाजारमूल्य नष्ट झाले आहे. एजे बेलचे डॅन कोटस्वर्थ यांच्या मते, जर फ्युचर्सद्वारे दर्शवलेले नुकसान कायम राहिले, तर ६ ऑक्टोबरच्या उच्चांकापासून आतापर्यंत एकूण ३ ट्रिलियन डॉलर्सचे मूल्य नष्ट झाले असेल.