Vodafone Idea Shares Surge January 2026: कर्जबाजारी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये आज (९ जानेवारी) मोठी तेजी पाहायला मिळाली. बाजार उघडताच व्होडाफोन आयडियाचे शेअर्स जवळपास ८ टक्क्यांनी वाढून १२.५२ रुपयांवर पोहोचले होते. कंपनीला एजीआर (Adjusted Gross Revenue) थकबाकी प्रकरणात दिलासा मिळाल्याच्या बातमीनंतर शेअर्समध्ये ही तेजी दिसली.
व्होडाफोन आयडियाने सेबीला सांगितले आहे की, त्यांना दूरसंचार विभागाकडून एजीआर थकबाकीबाबत अधिकृत पत्र मिळाले आहे. कंपनीच्या पत्रानुसार २००६-०७ ते २०१८-१९ या कालावधीतील त्यांची एजीआर थकबाकी आता गोठवली गेली आहे आणि थकबाकी भरण्यासाठी मोठी दिर्घकालीन मुदत देण्यात आली आहे. बऱ्याच काळापासून आर्थिक दबावाचा सामना करत असलेल्या व्होडाफोन आयडियासाठी ही सवलत महत्त्वाची मानली जाते.
व्होडाफोन आयडियाने सांगितले की, त्यांच्या एकूण एजीआर थकबाकीमध्ये मूळ रक्कम, व्याज, दंड आणि दंडावरील व्याज यांचा समावेश आहे. याची परतफेड तीन टप्प्यात केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात कंपनीला मार्च २०२६ ते मार्च २०३१ या सहा वर्षांसाठी वार्षिक जास्तीत जास्त १२४ कोटी रुपये द्यावे लागतील. दुसऱ्या टप्प्यात मार्च २०३२ ते मार्च २०३५ या चार वर्षांसाठी वार्षिक १०० कोटी रुपये द्यावे लागतील आणि उर्वरित थकबाकी त्यानंतर मार्च २०३६ ते मार्च २०४१ दरम्यान सहा समान वार्षिक हप्त्यांमध्ये फेडली जाईल.
कंपनीने असेही स्पष्ट केले की, दूरसंचार विभागाने एजीआर थकबाकीचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीचा निर्णय अंतिम असेल आणि पुनर्मूल्यांकनानंतर निश्चित केलेली रक्कम देखील मार्च २०३६ ते मार्च २०४१ दरम्यान समान हप्त्यांमध्ये भरली जाईल.
या बातमीनंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. मात्र, सुरुवातीच्या तेजीनंतर शेअरमध्ये काही प्रमाणात प्रॉफिट-बुकिंग देखील दिसून आली. सकाळी १० वाजता कंपनीच्या शेअर्सनी सुमारे १२.५२ रुपयांचा उच्चांक गाठला होता. गेल्या सहा महिन्यांत कंपनीचे शेअर्स अंदाजे ६६ टक्क्यांनी वाढले आहेत.
एजीआर म्हणजे काय?
एजीआर (Adjusted Gross Revenue) म्हणजे कंपनीचा एकूण महसूल असतो, ज्या आधारे सरकार परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम शुल्क आकारते. केंद्र सरकारने दूरसंचार कंपन्यांसाठी तयार केलेल्या आर्थिक मदत किंवा सवलत योजनेला एजीआर पॅकेज म्हणतात. या पॅकेजअंतर्गत कंपन्यांना त्यांची थकबाकी भरण्यासाठी सवलती, हप्ते किंवा मुदतवाढ दिली जाते.
