Thalapathy Vijay TVK party set to influence the state’s industrial landscape and investor sentiment: तमिळनाडूच्या राजकारणातला डीएमके आणि एआयडीएमके या दोन पक्षांचा तो सुवर्णकाळ आता मागे पडताना दिसतोय. अभिनेते थलपती विजय यांनी केवळ राजकीय पक्ष काढला नाही, तर तो प्रस्थापित सत्ताकेंद्रांना पर्याय म्हणून उभा केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांनी दणदणीत विजय मिळवत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या एआयडीएमकेची सत्ता उलथावून लावली आहे.

यामध्ये विजय यांचा टीव्हीके पक्ष १०८ जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असले तरी त्यांना बहुमतासाठी आणि १० आमदारांची गरज भासणार आहे. तसेच तमिळनाडूसह देशभरात आता चर्चा केवळ सत्तेची नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेची आहे. तमिळनाडू हे उद्योगांचे हब असल्याने, विजय यांच्या या राजकीय एन्ट्रीचा शेअर बाजार आणि कॉर्पोरेट जगतावर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

भारतातील सर्वात महत्त्वाचे उत्पादन आणि निर्यात केंद्र

राष्ट्रीय निवडणुकांप्रमाणे तमिळनाडूचे निकाल कदाचित रातोरात प्रमुख निर्देशांकांमध्ये बदल घडवून आणणार नाहीत, परंतु ते भारताच्या सर्वात महत्त्वाच्या उत्पादन आणि निर्यात केंद्रांपैकी एक आहे. हे राज्य भारताच्या जीडीपीमध्ये अंदाजे ८-९% योगदान देते, ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्सचे एक प्रमुख केंद्र आहे आणि येथे ऑटोमोबाईल, सेमीकंडक्टर, संरक्षण, वस्त्रोद्योग आणि नवीकरणीय ऊर्जा (renewable energy) क्षेत्रातील जागतिक उत्पादक आहेत.

विश्लेषक काय म्हणतात?

स्वस्तिका इन्व्हेस्टस्मार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले की, शेअर बाजारांची सुरुवातीची प्रतिक्रिया ही भावनिक असण्यापेक्षा अधिक संयमित असण्याची शक्यता आहे.

“टीव्हीकेची दमदार कामगिरी ही संमिश्र, परंतु सावध व्यावसायिक वातावरण निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. विजय यांनी कल्याणकारी कार्ये, सामाजिक न्याय आणि भ्रष्टाचार निर्मूलन यांवर दिलेला भर, यामुळे राजकोषीय खर्च आणि नियामक देखरेख यांबाबत अल्पकालीन चिंता निर्माण होऊ शकतात”, असे मीना म्हणाले.

“परंतु त्यांची स्वच्छ प्रतिमा, तरुणांशी असलेला संवाद आणि रोजगार, MSMEs, स्टार्टअप्स व आर्थिक विकास यांबाबत त्यांनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्यावहारिक पद्धतीने केली गेली तर प्रशासनाविषयीचा समज सुधारू शकतो.” याबाबत ईकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तामध्ये उल्लेख आहे.

विजय यांचा उदय हा केवळ…

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मुख्य अर्थतज्ज्ञ माधवी अरोरा म्हणाल्या की, विजय यांचा उदय हा केवळ एक निवडणुकीतील अनपेक्षित निकाल नसून, एक रचनात्मक राजकीय बदल दर्शवतो.

तामिळनाडूची औद्योगिक व्यवस्था ही राजकीयदृष्ट्या अस्थिर असलेल्या इतर अनेक राज्यांच्या तुलनेत कितीतरी अधिक भक्कम आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतांना काहीसा दिलासा मिळू शकेल.

“चेन्नईसारख्या प्रमुख केंद्रांमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास कायम भक्कम राहण्याची शक्यता आहे. कारण तामिळनाडूचा औद्योगिक पाया, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा या गोष्टी आधीच अत्यंत सक्षम आहेत. आता बाजारपेठांचे लक्ष व्यवसाय सुलभता (Ease of Doing Business) आणि औद्योगिक प्रोत्साहन योजनांबाबतच्या धोरणात्मक स्पष्टतेकडे लागले असेल”, असे त्यांनी नमूद केले.

तामिळनाडू महत्त्वाचे का आहे?

तामिळनाडू हे ह्युंदाई मोटर कंपनी, फोर्ड मोटर कंपनी, फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि अशोक लेलँड यांसारख्या कंपन्यांना आधार देणाऱ्या उत्पादन क्लस्टर्सचे केंद्र आहे. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीला चालना, ईव्ही उत्पादन योजना आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेसाठीही हे राज्य केंद्रस्थानी आहे.

औद्योगिक प्रोत्साहन, कामगार सुधारणा, भूसंपादन, वीज दर किंवा लॉजिस्टिक्स मंजुरी यांसारख्या धोरणात्मक बदलांचा कंपन्यांच्या भांडवली खर्चाच्या निर्णयांवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच, विजय यांच्या प्रचारातील आश्वासनांचे रूपांतर सातत्यात होते की त्यात व्यत्यय येतो, याकडे गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

कोणत्या क्षेत्रांवर होणार परिणाम?

धोरणात सातत्य राहिल्यास तामिळनाडूशी संबंधित जी क्षेत्रे चर्चेत राहू शकतात, त्यांमध्ये ऑटो आणि ऑटोचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, इंडस्ट्रिअल पार्क आणि लॉजिस्टिक्स, नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) आणि ग्रीड पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे.

टीव्हीएस मोटर कंपनी, अशोक लेलँड, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया, टायटन कंपनी आणि टाटा पॉवर कंपनी यांसारख्या, तामिळनाडूमध्ये मोठा व्यवसाय असलेल्या कंपन्यांमध्ये, येत्या काही आठवड्यांत धोरणात्मक संकेत मिळाल्यास भावनिक हालचालींचा प्रभाव दिसू शकतो. सध्या तरी, बाजारात भीती पसरण्याची शक्यता कमी आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.