मुंबई : भारतीय शेअर बाजारात चौफेर घसरण सुरू असताना, दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘व्होडाफोन आयडिया’च्या (व्हीआय) समभागाने मात्र बुधवारी बाजाराच्या विरुद्ध दिशेने जात तेजीचा कल राखला. गुंतवणूकदारांच्या सातत्यपूर्ण खरेदीच्या जोरावर ‘व्होडाफोन आयडिया’चा शेअर ‘बीएसई’वर ०.९१ टक्क्यांच्या वाढीसह १४.२९ रुपयांवर पोहोचला. गेल्या अवघ्या एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल ४० टक्क्यांचा बंपर परतावा दिला असून, यामुळे यात आणखी वाढ होणार का, याकडे बाजार विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

पतमापन संस्थांकडून कंपनीच्या पतमापनात झालेली लक्षणीय सुधारणा आणि जागतिक ब्रोकरेज हाऊसेसने वाढवलेले उद्दिष्ट यामुळे या शेअरमध्ये तेजीचे वारे वाहत आहेत.

‘इक्रा’कडून ‘A-‘ रेटिंगसह ‘स्थिर’ आउटलुक

पतमापन संस्था ‘इक्रा’ने व्होडाफोन आयडियाच्या क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा करत ते ‘BBB’ वरून थेट ‘A-‘ केले आहे. तसेच कंपनीचा आउटलुक ‘पॉझिटिव्ह’वरून बदलून ‘स्थिर’ केला आहे.

या सुधारणेमागील प्रमुख कारणे

  • प्रवर्तकांचा पाठिंबा : आदित्य बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला यांची बोर्डाच्या अध्यक्षपदी झालेली पुनर्नियुक्ती कंपनीसाठी सकारात्मक ठरली आहे.
  • ४,७३० कोटींचे भांडवल : मे २०२६ मध्ये प्रवर्तक समूहाकडून ‘वारंट्स’च्या माध्यमातून सुमारे ४,७३० कोटी रुपयांचे नवीन भांडवल कंपनीत आणण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे, ज्यामुळे कंपनीवरील विश्वास वाढला आहे.
  • सरकारी दिलासा : ‘एजीआर’ थकबाकी गोठवणे आणि सरकारने आधी केलेले इक्विटी रूपांतर यावरून दूरसंचार क्षेत्रात तीन खासगी कंपन्या टिकवून ठेवण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट होतो.

‘सिटी’कडून ‘बाय’ रेटिंग; १७ रुपयांचे नवे लक्ष्य

ब्रोकरेज फर्म ‘सिटी’ने व्होडाफोन आयडियावरील नकारात्मक ‘हाय रिस्क’ ही श्रेणी हटवून हा शेअर आता ‘खरेदी’ करण्याचा सल्ला दिला आहे. ‘सिटी’ने शेअरची लक्ष्य किंमत १४ रुपयांवरून वाढवून थेट १७ रुपये प्रति शेअर केली आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीवरून या शेअरमध्ये अजून २० टक्क्यांहून अधिक वाढीची शक्यता आहे.

दुसरीकडे, ‘क्रिसिल’ या मानांकित संस्थेनेही कंपनीच्या प्रस्तावित बँकिंग सुविधांना ‘A-/Stable’ रेटिंग दिले आहे. या घडामोडींमुळे कंपनीसमोरील रोख रकमेची अडचण मोठ्या प्रमाणात दूर होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे बँक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

गुंतवणूकदारांसाठी धोक्याचे संकेत

‘सिटी’च्या विश्लेषकांनुसार, जरी शेअरमध्ये तेजी असली तरी गुंतवणूकदारांनी खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे

  • १. बँकांकडून निधी मिळण्यास विलंब झाल्यास अडचणी वाढू शकतात.
  • २. दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र झाल्यास आगामी काळात ‘टॅरिफ’ (प्लॅनचे दर) वाढवण्यात अडचणी येतील.
  • ३. ग्राहक सोडून जाण्याचे प्रमाण न थांबणे आणि ४जी/५जी ग्राहक जोडण्याचा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहणे घातक ठरू शकते.

बाजारमूल्य १.५३ लाख कोटींच्या पार

‘व्होडाफोन आयडिया’च्या समभागाने गेल्या काही आठवड्यांत शेअर बाजारात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जून २०२६ च्या सुरुवातीला व्होडाफोन आयडियाचा शेअर १४.१९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत असून, त्याने १४.४४ रुपयांचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या अवघ्या एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल ३५ ते ४० टक्क्यांचा परतावा दिला आहे. शेअरमधील या जोरदार तेजीमुळे व्होडाफोन आयडियाचे एकूण बाजारमूल्य वाढून १,५३,४१४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.