Vodafone Idea Share Price : व्होडाफोन आयडिया या कंपनीमागे लागलेले शुक्लकाष्ठ अखेर संपण्याची शक्यता आहे. कर्जामुळे अडचणीत असलेल्या ‘व्होडाफोन-आयडिया’साठी बुधवारचा दिवस ‘सुपर वेन्सडे’ ठरला. टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्हीआयच्या शेअरमध्ये बुधवारी ५ टक्क्यांची जोरदार वाढ पाहायला मिळाली. केवळ तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना १० टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनात झालेल्या मोठ्या बदलाचे पडसाद शेअर बाजारात उमटले असून गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
५ वर्षांनंतर कुमार मंगलम बिर्लांची ‘घरवापसी’
व्होडाफोन-आयडियामधील या तेजीचे मुख्य कारण म्हणजे कुमार मंगलम बिर्ला यांचे ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून बोर्डात परतणे हे आहे. २०२१ मध्ये कंपनी जेव्हा गंभीर आर्थिक संकटातून जात होती, तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता ते रवींद्र टक्कर यांची जागा घेणार असून टक्कर हे आता उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील.
गुंतवणूकदारांमध्ये वाढला विश्वास
२०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या AGR थकबाकीवरील निकालानंतर कंपनी गंभीर आर्थिक अडचणीत सापडली. कंपनीवर सरकारचं ओझं वाढतच गेले. पैशांच्या बदल्यात सरकारने कंपनीत मोठा हिस्साही घेतला आहे. स्वतः बिर्ला यांनीदेखील त्यावेळी ऑपरेशन्स चालू ठेवणे अशक्य असल्याचे म्हटले होते. मात्र, आता सरकारकडून मिळालेले मदत पॅकेज आणि बिर्लांचे अनुभवी नेतृत्व यामुळे कंपनी पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे.
शेअर कामगिरीचा ताळेबंद
बिर्ला परतल्याच्या बातमीनंतर व्हीआयच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. आज सकाळी शेअर ११.१० रुपयांवर उघडला असून इंट्राडेमध्ये ११.३८ रुपयांचा उच्चांक गाठला. गेल्या काही दिवसांत शेअर २७ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. गेल्या ६ महिन्यांत २०% तर गेल्या १ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना ६२% इतका बंपर परतावा दिला आहे. या वर्षात सुरुवातीला काहीसा दबाव असल्याने शेअर अद्याप ३% तोट्यात आहे. परंतु, सध्याची तेजी हा तोटा भरून काढण्याच्या मार्गावर आहे.
कुमार मंगलम बिर्ला यांच्या परतण्याने नेमकं काय झालं?
बिर्लांचे परतणे हे केवळ एका पदावरील नियुक्ती नसून बाजारासाठी तो एक मोठा ‘सेन्टिमेंटल’ बूस्ट आहे. जेव्हा प्रवर्तक स्वतः सूत्रे हाती घेतात, तेव्हा बँका आणि गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास दुपटीने वाढतो. व्हीआय आता २५,००० कोटी रुपयांचे कर्ज उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारी मदतीमुळे (AGR थकबाकीतील कपातीमुळे) कंपनीला भांडवल उभारणी आणि नेटवर्क विस्तारासाठी मोठा वाव मिळाला आहे.
