Warren Buffett investment strategy Marathi : सामान्य गुंतवणूकदार सहसा शेअर बाजारातील कंपन्यांचे निव्वळ आकडे किंवा वाढलेला तिमाही नफा पाहून घाईघाईने शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतात. परंतु, जागतिक कीर्तीचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या मते, ही पद्धत दीर्घकाळात अत्यंत नुकसानकारक ठरू शकते. बफे यांनी तब्बल ४८ वर्षांपूर्वी त्यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीच्या शेअरधारकांना लिहिलेल्या एका ऐतिहासिक पत्रात स्पष्ट केले होते की, केवळ नफा किंवा ‘ईपीएस’ (EPS) न पाहता कंपन्यांचा ‘रिटर्न ऑन इक्विटी’ (ROE) तपासणे गुंतवणूकदारांसाठी का महत्त्वाचे आहे.

रिटर्न ऑन इक्विटी

अनेक कंपन्या नफा फुगवून दाखवतात. पण, या आकड्यांना न भुलता, कंपनी भांडवलाचा किती कौशल्याने वापर करते? हे गुंतवणूकदारांनी पाहणे महत्त्वाचे आहे. गुंतवणूक करताना कंपनीची आर्थिक स्थिती आणि नफा कमावण्याची क्षमता तपासण्यासाठी रिटर्न ऑन इक्विटी (Return on Equity – ROE) या सूत्राचा वापर होतो. हे एक आर्थिक गुणोत्तर आहे, जे कंपनी भागधारकांच्या पैशातून किती कार्यक्षमतेने नफा कमावते हे दर्शवते. सोप्या भाषेत सांगायचे तर, कंपनीने गुंतवलेल्या प्रत्येक १०० रुपयांच्या बदल्यात किती रुपये नफा मिळवला, हे यातून समजते.

ईपीएसचे आकडे पाहून भाळू नका

१९७७ साली बफे यांच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीचा EPS (Earnings Per Share) म्हणजे ‘प्रति शेअर कमाई’ ३७ टक्के वाढला होता. वरवर पाहिलं तर ही चांगली कामगिरी वाटते. पण, ईपीएस पाहून आनंदी होणे चूक होईल, असं बफे म्हणाले. कारण, त्याचवेळी कंपनीच्या भांडवलात २४ टक्के वाढ झाली होती. याचा अर्थ कंपनीने केवळ जास्त भांडवल लावून आपली कमाई वाढवली होती. खरा प्रश्न शेअरधारकांच्या पैशावर कंपनी किती परतावा मिळवते हा आहे. ‘ईपीएस’ हे एका शेअरमागे मिळणारा निव्वळ नफा दर्शवते. सोप्या भाषेत सांगायचे तर, कंपनीने कमावलेला नफा जर समभागांमध्ये वाटून दिला, तर प्रत्येक शेअरच्या वाट्याला किती नफा येईल, हे EPS वरून समजते.

नफा फुगवणे प्रत्येकवेळी चांगले नाही

समजा A कंपनीची नफा वाढ २०% आणि इक्विटी वाढ ३०% आहे, दुसरीकडे B कंपनीची नफा वाढ १५% आणि इक्विटी वाढ ५% आहे, तर प्रथमदर्शनी तुम्हाला कोणती कंपनी चांगली कामगिरी करते असे वाटेल? साहजिक A कंपनी. पण, वास्तव वेगळं आहे, या उदाहरणात कंपनी बी आपल्या भांडवलाचा प्रभावी उपयोग करत आहे. कंपनीचा ROE चांगला असेल आणि शेअरधारकांना चांगला परतावा मिळेल.

कंपनीचे रिपोर्टकार्ड सांगणारे ३ प्रश्न

  1. ROE वाढण्याचे कारण काय? खरच नफा वाढला की इक्विटी कमी केली आहे.
  2. रोख प्रवाह चांगला आहे का? फक्त अकाउंटिंग प्रॉफीट नाही तर प्रत्यक्षात रोख देखील येत आहे का? हे पाहणे आवश्यक आहे.
  3. ROE हा सतत उच्चांकावर आहे का? एखाद्या वर्षी एखादी कंपनी चांगली काम करू शकते. पण, वर्षानुवर्षे वरच्या स्तरावर असलेला ROE कंपनीचे खरे आरोग्य दाखवते.