Warren Buffett : भारतीय शेअर बाजारात २०२५ च्या मध्यापासून सुरू झालेली घसरण थांबवण्याचे नाव घेत नाहीये. सुरुवातीला परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची चौफेर विक्री, त्यानंतर कंपन्यांची कमकुवत तिमाही कामगिरी यामुळे बाजार दबावाखाली होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीस इराण आणि इस्राइलमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याने बाजाराला सर्वात मोठा धक्का बसला. बाजारातील या सातत्यपूर्ण घसरणीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार चिंतेत आहेत. विशेषतः ‘एसआयपी’च्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचे पोर्टफोलिओ लाल झाले आहेत. जर तुम्हीही बाजाराच्या या घसरणीमुळे त्रस्त असाल, तर जगातील सर्वात दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचा एक मोलाचा सल्ला तुम्हाला नक्कीच दिशा दाखवू शकतो.
दीर्घकालीन गुंतवणुकीतच होते खरी कमाई
शेअर बाजाराचा इतिहास पाहिला तर चढउतार हा बाजाराता स्थायी भाव आहे. जगातील एकही शेअर बाजार असा नसेल जिथे कधीच घसरण झाली नाही. त्यामुळे अशा घसरणीकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला वॉरेन बफे यांनी दिला आहे. शेअर बाजारातून अल्पकाळात काहीवेळा नफा मिळू शकतो. पण, जर तुम्हाला संपत्ती निर्माण करायाची असेल त्यासाठी ‘दीर्घकालीन गुंतवणूकदार’ होणे आवश्यक आहे, असे बफे मानतात.
..तर शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका : वॉरेन बफे
२०१५ मध्ये ‘द स्ट्रीट’ला दिलेल्या एका मुलाखतीत वॉरेन बफे यांनी गुंतवणूकदारांना एक परखड सल्ला दिला होता. ते म्हणाले “जर तुम्हाला बाजारातील पडझड किंवा करेक्शनची भीती वाटत असेल, तर तुम्ही शेअर्स खरेदीच केले नाही पाहिजेत.” जर तुम्ही दीर्घकालीन उद्दीष्ट ठेवून मोठी संपत्ती निर्माण करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी शेअर बाजार हा सुवर्णमार्ग असल्याचे बफेंनी सांगितले होते.
योग्य किंमतीला खरेदी करा आणि विसरून जा!
बफे यांच्या मते, जर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर तुम्हाला योग्य वाटणाऱ्या किमतीला खरेदी केला असेल, तर तो कमीत कमी २० वर्षांसाठी होल्ड करून ठेवण्याची तुमची तयारी असायला हवी. अशा गुंतवणूकदारांनी रोजच्या रोज शेअर्सचे भाव तपासण्याची गरज नसते. अनेक नवख्या गुंतवणूकदारांना शेअर बाजार म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचे साधन वाटते. याच कारणामुळे शेअर्सच्या किमती थोड्या जरी घसरल्या की त्यांची धडधड वाढते.
पहिल्यांदाच मंदी पाहणारे ‘नवीन’ गुंतवणूकदार अधिक चिंतेत
वर्ष २०२० मध्ये कोविड महामारी आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी घरात बसून डिमॅट खाती उघडली आणि शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच बाजारात जबरदस्त तेजी आली आणि या नव्या गुंतवणूकदारांनी भरपूर नफा कमावला. परंतु, २०२४ च्या सप्टेंबर अखेरीस भारतीय बाजारात सुरू झालेली घसरण अजूनही (मे २०२६) सुरूच आहे. या प्रदीर्घ घसरणीमुळे अशा ‘नवीन’ गुंतवणूकदार भयभीत झाले आहेत. कारण, यापूर्वी त्यांनी अशी मंदी पाहिलेली नाही.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
