Warren Buffett : परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा, अमेरिकेने लादलेले आयात शुल्क, पश्चिम आशियातील संघर्षामुळे वाढलेले कच्च्या तेलाचे भाव अशा चहूबाजूंनी आलेल्या संकटांमुळे भारतीय शेअर बाजाराने वर्षभरात सपाटून मार खाल्ला. यात दिग्गज गुंतवणूकदारांपासून सर्वसामान्य लोक होरपळून निघाले आहेत. परिणामी अनेक गुंतवणूकदार एसआयपी बंद करण्याचा किंवा शेअर्स विकून टाकण्याचा विचार करत आहे. अशा मनस्थितीत तुम्ही देखील असाल तर प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांचा एक सल्ला वाचूनच निर्णय घ्या.
वॉरन बफे १९८७ साली दिला होता शेअरधारकांना सल्ला
प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी १९८७ मध्ये बर्कशायर हॅथवेच्या शेअरधारकांना एक पत्र लिहिलं होतं. यात त्यांचे गुरू बेंजामिन ग्रॅहम यांनी सांगितलेली ‘मिस्टर मार्केट’ची एक रुपककथा सांगितली होती. बेंजामिन म्हणाले, समजा तुम्ही एका खासगी व्यवसायात ‘मिस्टर मार्केट’ नावाच्या व्यक्तीसोबत भागीदारीत आहात. हा भागीदार दररोज तुम्हाला दोन किमती सांगतो, एक ज्या किमतीला तो तुमचे शेअर्स खरेदी करायला तयार आहे आणि दुसरी ज्या किमतीला तो स्वतःचे शेअर्स तुम्हाला विकायला तयार आहे. या किमती व्यवसायातील बदलांवर ठरत नाहीत, तर मिस्टर मार्केटच्या मूडवर ठरतात. एखाद्या दिवशी तो अतिउत्साहात असतो तर कधी कधी निराश होऊन कवडीमोलाने शेअर्स विकायला तयार होतो.
कथेतून ग्रॅहम सांगतात, की बाजारातील किमती केवळ टोकाच्या परिस्थितीमध्येच फायद्याच्या ठरतात. जेव्हा तुम्ही निराश मिस्टर मार्केट कडून स्वस्तात खरेदी करता किंवा उत्साही मिस्टर मार्केटला महागात शेअर्स विकता. बाकीच्या वेळी त्याच्या किमतींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पाहिजे. कारण, ती किंमत व्यवसायाचे खरे मूल्य नसून, केवळ त्या व्यक्तीची मानसिक स्थितीची किंमत आहे.
१९८७ ते २०२६: बाजारात काय बदलले?
१९८७ मध्ये शेअर बाजार दिवसातून साडेपाच तास आणि आठवड्यातून पाच दिवस उघडा असायचा. तेव्हा कोणतेही स्मार्टफोन, ट्रेडिंग अॅप्स किंवा रिअल-टाइम पोर्टफोलिओ डॅशबोर्ड नव्हते. शेअर्सचे भाव पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्राची वाट पाहावी लागायची किंवा ब्रोकरला फोन करावा लागायचा. मिस्टर मार्केट दिवसातून फक्त एकदाच तुमच्या कार्यालयात यायचा. पण, आज परिस्थितीत पूर्णपणे वेगळी आहे. रिअल टाइममध्ये भाव समजत असल्याने मार्केटचा मूड प्रचंड लहरी झाला आहे. थोडक्यात, आता मिस्टर मार्केट ठराविक वेळेत येत नाही, तर तो सेकंदा-सेकंदाला नवीन मतांसह तुमच्या खोलीत २४ तास हजर असतो.
गुंतवणूकदारासमोरील आव्हाने
आज २०२६ मध्ये गुंतवणूकदारांसमोर २ मोठी आव्हाने आहेत. एखाद्या व्यवसायाचे खरे मूल्य काय आहे? दुसरं म्हणजे दिवसातून शेकडो वेळा स्क्रीनवर बदलणारे भाव दिसत असतानाही, स्वतःवर ताबा ठेवून घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय कसा टाळायचा?
गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण नियम
आजचे ट्रेडिंग अॅप्स तुम्हाला जास्तीत जास्त व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणजे सतत नोटिफिकेशन्स, डॅशबोर्ड वैगेरे दाखवून. अशा वेळी २०२६ मधील यशस्वी गुंतवणूकदार तो नाही ज्याच्याकडे जास्त माहिती आहे; तर तो आहे ज्याने स्वतःमध्ये आणि मिस्टर मार्केटमध्ये अंतर ठेवले आहे. (उदा. पोर्टफोलिओ कमी वेळा पाहणे, नोटिफिकेशन्स बंद ठेवणे).
