West Bengal Election Result Impact On Share Market: पश्चिम बंगालमधील संभाव्य सत्तांतर भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) सुमारे ५० आधार बिंदूंची (Basis points) भर घालू शकते. कारण या महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या कलांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी (भाजपा) आघाडीवर आहे, सोमवारी बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांसह, केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्येही सध्या मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजाप आघाडीवर आहे. तर तमिळनाडूमध्ये सिनेअभिनेते थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

निवडणुकीचा हा निकाल, २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भाजपाला मिळणाऱ्या राजकीय पाठिंब्याचे एक प्राथमिक निदर्शक आहे. विश्लेषकांच्या मते, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय झाल्यास, केंद्राशी धोरणात्मक सुसंवाद आणि संभाव्य गुंतवणुकीचा ओघ यांद्वारे राज्यातील आर्थिक घडामोडींना चालना मिळू शकेल.

योग्य सरकार एखाद्या राज्याचे नशीब पालटू शकते

एका उद्योगविषयक कार्यक्रमात बोलताना सुनील सिंघानिया म्हणाले, “पश्चिम बंगालमधील सत्तांतर आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) ०.५ टक्क्यांची भर घालू शकते. यामुळे आपल्या देशाच्या विकासात लक्षणीय वाढ होऊ शकते आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा ‘गुणक’ (Multiplier) ठरण्याची क्षमता यात आहे.”

विकास खेमानी यांनी म्हटले की, निवडणुकीचे निकाल राज्याच्या आर्थिक क्षमतेला चालना देण्यास कारणीभूत ठरू शकतात. “एक योग्य सरकार एखाद्या राज्याचे नशीब पालटू शकते. हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरेल”, असे त्यांनी पुढे नमूद केले.

भाजपा सरकारच्या धोरणांमुळे रिटेल क्षेत्राला चालना

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने घेतलेल्या आघाडीमुळे, ४ मे रोजी ‘बाजार स्टाइल रिटेल’च्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली. ही कंपनी पूर्व भारतात २५० हून अधिक दुकाने चालवते आणि पश्चिम बंगालमध्ये तिचे भक्कम अस्तित्व आहे.

या शेअर्सच्या किमती वाढल्याचे कारण असे की, भाजपाने प्रस्तावित केलेल्या कल्याणकारी उपाययोजनांमध्ये महिला आणि बेरोजगार तरुणांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्यासारख्या तरतुदींचा समावेश आहे. याचा लाभ किरकोळ विक्री क्षेत्रावर (रिटेल) लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्यांना मिळू शकतो आणि अशा उपाययोजनांमुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेला (उपभोगाला) चालना मिळण्याची शक्यता आहे.

विजय चंडोक म्हणाले, “हे स्पष्ट आहे की जनता सध्याच्या सरकारांना कंटाळली आहे. याचा बाजारांवर काय परिणाम होतो, हे पाहणे अद्याप बाकी आहे.”

सेन्सेक्स १ हजार अंशांनी वधारला

या विधानसभा निवडणुकांच्या या कलांना भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ९९७.२५ अंशांनी (किंवा १.३ टक्क्यांनी) वधारून ७७,९१०.७५ वर पोहोचला, तर निफ्टी २९२.७५ अंशांनी (किंवा १.२ टक्क्यांनी) वाढून २४,२९०.२० वर पोहचला आहे. पण, बाजाराची ही प्रतिक्रिया अल्पकालीन असू शकते, असा सावधगिरीचा इशारा विश्लेषकांनी दिला.