SpaceX IPO : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क लवकरच जागतिक बाजारातील महाकाय आयपीओ बाजारात आणण्याची तयारी करत आहेत. मस्क यांच्या मालकीची प्रसिद्ध अंतराळ संशोधन कंपनी ‘स्पेसएक्स’ येत्या १२ जून रोजी ‘नॅस्डॅक’ या अमेरिकच्या शेअर बाजारात सुचिबद्ध होण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून १३५ डॉलर प्रति शेअर या दराने ५५.५६ कोटी शेअर्सची विक्री करणार आहे. या ऐतिहासिक आयपीओद्वारे सुमारे ७५ अब्ज डॉलर्स उभे केले जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, ‘स्पेसएक्स’ शेअर बाजारात आल्यानंतर रॉकेटसारखा धावणार की भूतकाळातील इतर मोठ्या आयपीओप्रमाणे पहिल्याच वर्षी गुंतवणूकदारांचे हात भाजणार? यावरुन चर्चा सुरू झाली आहे.

स्पेसएक्स नेमकं काय करते?

स्पेसएक्सची स्थापना अंतराळ संशोधन कंपनी म्हणून झाली होती. मात्र, आता कंपनी रॉकेट लॉन्चिंग, सॅटेलाइट इंटरनेट ते आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अशा तीन वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. एलॉन मस्क यांनी २००२ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने २००८ मध्ये द्रव इंधनावर चालणारे रॉकेट यशस्वीपणे कक्षेत पाठवणारी पहिली खासगी कंपनी होण्याचा मान मिळवला. आज जागतिक व्यावसायिक लॉन्चिंग बाजारपेठेवर स्पेसएक्सचे पूर्ण वर्चस्व आहे.

स्पेसएक्सचे पुढील लक्ष्य काय?

गेल्या वर्षभरात कंपनीने १६५ यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या, तर २००२ पासून आतापर्यंत एकूण ६५० लॉन्चिंग केले आहेत. २०२३ पासून अंतराळात पाठवण्यात आलेल्या एकूण जागतिक वजनापैकी ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा एकट्या स्पेसएक्सचा आहे. रॉकेटचा पुनर्वापर करण्याच्या तंत्रज्ञानामुळे कंपनीने लॉन्चिंगचा खर्च कमालीचा कमी केला आहे. २०२५ मधील ९५ टक्क्यांहून अधिक मोहिमांमध्ये अशा पुनर्वापर केलेल्या बूस्टर्सचा वापर करण्यात आला. आता कंपनीचे पुढील लक्ष ‘स्टारशिप’ या पूर्णपणे पुनर्वापर करता येणाऱ्या प्रणालीवर असून, २०२६ च्या उत्तरार्धात याद्वारे व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्याची अपेक्षा आहे.

‘स्टारलिंक’ खेड्यापाड्यात पोहोचली

कंपनीची ‘स्टारलिंक’ ही सॅटेलाइट इंटरनेट सेवा सध्या गेमचेंजर ठरत आहे. जगातील १६४ देशांमध्ये स्टारलिंकचे १ कोटीहून अधिक ग्राहक आहेत. अंतराळात फिरणाऱ्या एकूण सक्रिय सॅटेलाइट्सपैकी तीन चतुर्थांश म्हणजेच ९,६०० हून अधिक उपग्रह एकट्या स्टारलिंकचे आहेत, ज्याद्वारे जगातील ३.३ अब्ज लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचत आहे. गेल्या वर्षभरात या सेगमेंटने ७.१ अब्ज डॉलर्सचा मजबूत नफा नोंदवला आहे. याव्यतिरिक्त कंपनीने आता ‘ग्रोक एआय’ मॉडेल आणि ‘एक्स’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एआय क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीकडे सध्या जगातील सर्वात मोठा सुपरकॉम्प्युटर आणि एक गिगावॅटची कॉम्प्युट क्षमता आहे. या अवाढव्य गुंतवणुकीमुळे कंपनीचा महसूल २०२४ मधील १४ अब्ज डॉलर्सवरून वाढून २०२५ मध्ये १८.७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असला, तरी उपग्रह आणि एआयवरील प्रचंड खर्चामुळे कंपनीला २०२५ मध्ये ४.९ अब्ज डॉलर्सचा निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे.

महाकाय आयपींओचा शापित इतिहास

अमेरिकेच्या शेअर बाजाराचा इतिहास पाहिला तर आजवरच्या १० सर्वात मोठ्या मेगा आयपीओंपैकी ८ कंपन्यांनी बाजारात आल्यानंतर पहिल्या १२ महिन्यांत गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. यामध्ये अलिबाबा (-३० टक्के), मेटा (- ३१ टक्के), उबर टेक्नॉलॉजीज (-२१ टक्के), रिव्हियन (-६७ टक्के) आणि कुपांग (- ६५ टक्के) यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे, ज्यांनी पहिल्या वर्षात मोठी घसरण नोंदवली. केवळ ‘एआरएम होल्डिंग्स’ सारख्या अपवादात्मक कंपन्यांनी पहिल्या वर्षात १८९ टक्के परतावा दिला होता.