Zealand Pharma Stock Crash : डेन्मार्कची प्रसिद्ध औषध निर्माण कंपनी ‘झीलँड फार्मा’च्या लठ्ठपणा आणि वजन कमी करण्याच्या प्रायोगिक औषधाच्या क्लिनिकल चाचणीचे अंतिम निकाल समोर आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी बाजारात विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे एकाच दिवसात झीलँड फार्माचे शेअर्स तब्बल २५ टक्क्यांनी कोसळले. सोमवारी युरोपीय बाजारातील ‘स्टॉक्स ६००’ निर्देशांकात झीलँडचा शेअर सर्वात तळाशी पोहोचला. या घसरणीमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये या चालू वर्षात आतापर्यंत एकूण ५० टक्क्यांची प्रचंड पडझड झाली आहे.
वजन घटलं पण साईड इफेक्ट्स वाढले!
झीलँड फार्माचे हे नवे औषध ‘सर्वोड्युटाइड’ (Survodutide) या नावाने ओळखले जाते, ज्याचे व्यावसायिक परवाने त्यांनी ‘बोहरिंगर इंगेलहाइम’ या खासगी कंपनीला दिले आहेत. टाईप २ मधुमेह नसलेल्या आणि लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या प्रौढ व्यक्तींवर तब्बल ७६ आठवडे या औषधाची चाचणी घेण्यात आली. एप्रिल महिन्यात आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, या औषधामुळे रुग्णांचे सरासरी १६.६ टक्के वजन कमी झाल्याचे समोर आले होते. मात्र, सोमवारी जाहीर झालेल्या सविस्तर अहवालात असे दिसून आले की, औषधाच्या तीव्र साईड इफेक्ट्समुळे चाचणीत सामील झालेल्या १९ टक्के रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले, तर याउलट डमी औषध घेणाऱ्या केवळ २.९ टक्के रुग्णांनीच माघार घेतली होती. या औषधामुळे तब्बल ४० टक्क्यांहून अधिक रुग्णांना उलट्या आणि पोटाशी संबंधित गंभीर विकारांचा सामना करावा लागला.
इतर औषधांपेक्षा साईड इफेक्स्ट जास्त
बार्कलेज आणि सिटी बँकेच्या जागतिक विश्लेषकांच्या मते, या औषधामुळे यकृत आणि शरीराच्या रचनेवर काही सकारात्मक परिणाम झाले असले, तरी रुग्णांची असह्यता आणि १९ टक्के लोकांनी चाचणी सोडणे ही व्यापारी दृष्टिकोनातून अतिशय निराशाजनक बाब आहे. बाजारात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या ‘टिर्झेपेटाइड’ आणि ‘सेमाग्लुटाइड’ यांसारख्या प्रतिस्पर्धी औषधांच्या तुलनेत या नव्या औषधाचे साईड इफेक्ट्स खूप जास्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मळमळ, उलट्या, जुलाब आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास, हे औषध लठ्ठपणा किंवा फॅटी लिव्हरच्या उपचारांसाठी बाजारात व्यावसायिकदृष्ट्या टिकणे अत्यंत कठीण मानले जात आहे.
झीलँड फार्मासाठी हा सलग दुसरा मोठा धक्का
विशेष म्हणजे, झीलँड फार्मासाठी हा सलग दुसरा मोठा धक्का आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या ‘पेट्रेलिनटाईड’ (Petrelintide) या दुसऱ्या एका वजनाचा आजार दूर करणाऱ्या औषधाच्या चाचणीत अपेक्षेपेक्षा कमी वजन घटल्याचे समोर आले होते, ज्यामुळे कंपनीच्या शेअर्सने इतिहासातील सर्वात वाईट दिवसाचा सामना केला होता. रोश कंपनीसोबत विकसित केले जात असलेले हे पेट्रेलिनटाईड औषध सहनशीलतेच्या बाबतीत उत्तम असले, तरी त्याची कार्यक्षमता एली लिली (Eli Lilly) कंपनीच्या ‘इलोरालीनटाईड’ किंवा बाजारातील इतर औषधांइतकी चांगली नाही, असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे.
वजन कमी करणाऱ्या औषध बाजारात तीव्र स्पर्धा
सध्या जागतिक स्तरावर वजन कमी करणाऱ्या औषधांच्या बाजारपेठेवर ‘नोवो नॉर्डिस्क’ (Novo Nordisk) आणि ‘एली लिली’ या दोनच महाकाय कंपन्यांचे पूर्ण वर्चस्व आहे. नोवो नॉर्डिस्क हे आपले औषध ‘वेगोव्ही’ आणि ‘ओझेंपिक’ या ब्रँड नावांनी विकते, तर एली लिली हे ‘झेपबाउंड’ आणि ‘माऊंजायरो’ नावाने विकते. मात्र, हा बाजार अत्यंत फायदेशीर आणि अब्जावधी डॉलर्सचा असल्याने आता ॲमजेन (Amgen) आणि ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) यांसारख्या जागतिक कंपन्याही यात नशीब आजमावत आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्यांवर केवळ वजन कमी करणे नव्हे, तर स्नायूंचे वस्तुमान टिकवून ठेवणे, गोळ्यांच्या स्वरूपात औषध उपलब्ध करून देणे आणि दुष्परिणाम कमी करणे यासाठी प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
