Nithin Kamath Reaction Stock Market Holiday For BMC Electon: राज्यात आज मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे आज (१५ जानेवारी) भारतीय शेअर बाजार बंद आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या निर्णयावर झिरोधाचे प्रमुख नितीन कामथ यांनी चिंता व्यक्त केली आहे.

कामथ यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) आज बंद असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय बाजारांमध्ये जागतिक सहभाग वाढत असताना असा निर्णय नियोजनाचा अभाव आणि दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यात अपयश दर्शवतो, असे त्यांनी म्हटले.

झिरोधाचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे आज भारतीय शेअर बाजार बंद आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या आपल्या शेअर बाजारांचे कामकाज स्थानिक महानगरपालिका निवडणुकीसाठी बंद असणे, हे वाईट नियोजन आणि दूरगामी परिणामांबद्दलच्या गांभीर्याचा अभाव दर्शवते.”

कामथ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिग्गज गुंतवणूकदार चार्ली मंगर यांच्या वाक्याचा उल्लेख केला आणि म्हटले की, “मला प्रोत्साहन द्या, मी तुम्हाला निकाल दाखवतो.”

याबाबत त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की, “सुट्टी अस्तित्वात आहे कारण ती रद्द करण्यास विरोध करण्यासाठी कोणाकडेही फारसे प्रोत्साहन नाही. जोपर्यंत निर्णयांमध्ये सहभागी असलेले लोक स्वतः त्याचे परिणाम अनुभवत नाहीत, तोपर्यंत व्यवस्था बदलण्यासाठी कोणताही ठोस पुढाकार घेता येत नाही.”

कामथ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असे संकेत दिले आहेत की अशा निर्णयांवरून हे दिसून येते की, जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी भारताला अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. बाजारातील सातत्य, स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर भारताला एक गंभीर, विश्वासार्ह आणि मजबूत गुंतवणूक केंद्र बनवायचे असेल, तर स्थानिक कारणांसाठी बाजार बंद करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

शेअर बाजाराची आजची सुट्टी स्टॉक एक्सचेंजेसच्या मूळ २०२६ च्या ट्रेडिंग कॅलेंडरमध्ये समाविष्ट नव्हती, मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला ती जोडण्यात आली. बीएसई आणि एनएसईने स्वतंत्र परिपत्रकांद्वारे माहिती दिली आहे की महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमुळे १५ जानेवारी रोजी शेअर बाजाराला सुट्टी असेल.

दरम्यान, २०२६ मध्ये भारतीय शेअर बाजाराला एकूण १६ दिवस सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. बाजाराची पुढील सुट्टी सोमवार, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त असेल.