Zomato Founder Deepinder Goyal Net Worth Surge: झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीची पालक कंपनी असलेल्या इटर्नल लिमिटेडच्या शेअरमध्ये आज (गुरुवारी) मोठी तेजी पाहायला मिळत आहे. आज इटर्नल लिमिटेडचे शेअर सुमारे ७ टक्क्यांनी वाढले आहेत, कारण डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल वाढला आहे. तसेच ब्लिंकिट आणि हायपरप्युअरने अंदाजित वेळेच्या खूप आधी EBITDA (Earnings Before Interest, Taxes, Depreciation And Amortization) ब्रेक-इव्हन साधला आहे.
इटर्नलच्या शेअरमधील या सात टक्क्यांच्या वाढीमुळे सीईओ दीपेंद्र गोयल यांच्या संपत्तीत काही मिनिटांतच ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कारण गुंतवणूकदारांनी इटर्नलच्या तिसऱ्या तिमाहीच्या कमाईला सकारात्मक प्रतिसाद दिला असून जोरदार खरेदी केली आहे.
सकाळी ९.३० वाजता बीएसईवर इटर्नलचे शेअर ७.३३ टक्क्यांनी वाढून ३०४.२० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. गोयल कंपनीत सार्वजनिक भागधारक असून त्यांची इटर्नलमध्ये ३.८३ टक्के हिस्सेदारी आहे. बुधवारी १०,४७५ कोटी रुपयांच्या तुलनेत गुरुवारच्या व्यवहारात त्यांच्या हिस्स्याचे मूल्य ११,०९६ कोटी रुपये झाले आहे, ज्यामुळे त्यांना ६२१ कोटी रुपयांचा तात्पुरता नफा झाला आहे.
दरम्यान, दीपेंद्र गोयल यांनी काल अलबिंदर धिंडसा यांची इटर्नलचे ग्रुप सीईओ म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. यावेळी संस्थापक असलेल्या दीपेंद्र गोयल यांनी ते कंपनीत गैर-कार्यकारी भूमिका स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले होते.
दीपेंद्र गोयल यांनी काल शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, “गेल्या काही दिवसांमध्ये, माझे लक्ष्य अशा काही नवीन संकल्पनांकडे वेधले गेले आहे ज्यामध्ये अधिक जोखीमीचे संशोधन आणि प्रयोगांचा समावेश आहे. या अशा काही कल्पना आहेत ज्यावर इटर्नल सारख्या पब्लिक कंपनीच्या बाहेर राहून काम करणे चांगले राहील. जर या कल्पना इटर्नलच्या स्टॅटर्जी स्कोपमध्ये बसण्यासारख्या असत्या, तर मी त्यांचा पाठपुरावा कंपनीत राहूनच केला असता. पण ते तसे नाही.”
गोयल यांनी पत्रात पुढे सांगितले की, “माझ्याकडे इटर्नलमध्ये काम सुरू ठेवणे आणि बाहेर नव्या कल्पनांवर विचार करण्याची क्षमता आहे, मात्र भारतात एका पब्लिक कंपनीच्या सीईओशी संबंधित कायदेशीर आणि इतर जबाबदाऱ्यांवर पूर्ण लक्ष देण्याची गरज असते. हा बदल इटर्नलला तिच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची संधी देतो आणि मला त्या कल्पनांवर काम करण्यासाठी वाव देतो, ज्या कंपनीच्या रिस्क प्रोफाइलमध्ये बसत नाहीत.”
इटर्नलने आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसर्या तिमाहीत १०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. ही एका वर्षापूर्वीच्या ५९ कोटी रूपयांच्या तुलनेत ७३ टक्क्यांची वार्षिक वाढ आहे.
