scorecardresearch

जिद्दीची कमाल! ज्याकडे अनेकांनी केलं दुर्लक्ष, त्याच कल्पनेने सुनीराने उभारली ८२०० कोटींची कंपनी, काय आहे पाकिस्तानशी संबंध?

सुनीरा माधनी या मूळच्या पाकिस्तानी आहेत. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातून अमेरिकेला गेले होते. कौटुंबिक व्यवसाय बुडाल्याने वडिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुनीराने फ्लोरिडा विद्यापीठात फायनान्सचे शिक्षण घेतले

Suneera Madhani
सुनीरा माधनी

अमेरिकन फिनटेक फर्म स्टॅक्स(Stax)च्या सह-संस्थापक आणि सीईओ सुनीरा माधनी (Suneera Madhani)यांनी आपल्या भावासोबत मिळून ८,२०० कोटी रुपयांची कंपनी स्थापन केली आहे. विशेष म्हणजे ज्या कल्पनेकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं, तीच कल्पना सत्यात उतरवत सुनीरा यांनी ही कंपनी उभी केली. सुनीरा यांनी केवळ यशस्वी स्टार्टअपच तयार केले नाही, तर तिच्या व्यवसायासाठी पैसाही उभा केला. तसेच एक महिला यशस्वीपणे व्यवसाय चालवू शकत नाहीत ही अमेरिकेची धारणाही त्यांनी मोडून काढली. अमेरिकेत अशा समजुतीमुळे महिला उद्योजकांना निधी मिळण्यात खूप अडचणी येत आहेत.

सुनीरा माधनी या मूळच्या पाकिस्तानी आहेत. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातून अमेरिकेला गेले होते. कौटुंबिक व्यवसाय बुडाल्याने वडिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुनीराने फ्लोरिडा विद्यापीठात फायनान्सचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी पेमेंट प्रोसेसर कंपनी फर्स्ट डेटामध्ये नोकरी सुरू केली. त्यांचे काम हे व्यवसाय मालकाला पेमेंट टर्मिनल विकणे होते. नोकरीवर असताना सुनीराच्या लक्षात आले की, त्यांच्या कंपनीचे पेमेंट प्लॅटफॉर्म विक्री मॉडेलच्या टक्केवारीचा अवलंब करून ग्राहकांकडून शुल्क आकारत आहे, तर अनेक ग्राहक मासिक सब्सक्रिप्शन घेण्यासाठी अधिक इच्छुक आहेत. त्यांनी आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही हा पर्याय ग्राहकांना देण्याचा सल्ला दिला. पण त्याचा काही उपयोग नाही, असे सांगत अधिकाऱ्यांनी सुनीरा यांची ही कल्पना फेटाळून लावली.

स्टार्टअपची सुरुवात अशी झाली

सुनीरा यांनी या कल्पनेची त्यांच्या पालकांशी चर्चा केली. सुनीराच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला की, तिची कल्पना इतरांना देण्याऐवजी स्वतःच्या कल्पनेला आकार देण्यासाठी स्टार्टअप का सुरू करू नये. निधीच्या नावावर सुनीरा यांच्याकडे फक्त सहा महिन्यांचा पगार होता.

२०१४ मध्ये स्टॅक्स लाँच केले

सुनीरा माधनी यांनी तिचा भाऊ रहमतुल्लासोबत मिळून २०१४ साली स्टॅक्स कंपनीची स्थापना केली. इतर पेमेंट प्लॅटफॉर्म विक्री मॉडेलच्या टक्केवारीवर काम करत असताना स्टॅक्सने मासिक सब्सक्रिप्शन मॉडेलवर काम करण्यास सुरुवात केली. सुनीराने त्यांच्या व्यवसायासाठी सिलिकॉन व्हॅलीऐवजी ऑरलँडोची निवड केली. तिथे त्यांना सुरुवातीला १०० ग्राहक मिळाले. सुनीरा यांच्याकडे कंपनी १४५ कोटींमध्ये विकण्याची ऑफरही आली. पण त्यांनी ती फेटाळून लावली.

स्टॅक्सची आजची किंमत ८२०० कोटी आहे

सुनीरा यांची कंपनी स्टॅक्सची किंमत आज ८२०० कोटी रुपये आहे. त्यांच्या कंपनीत ३०० कर्मचारी काम करतात. गेल्या आठ वर्षांत स्टॅक्सने २३ अब्ज डॉलर किमतीचे व्यवहार केले आहेत. सुनीरा यांनी सीईओ स्कूल नावाचा एक बचतगटही स्थापन केला आहे. सुमारे ३ लाख नोकरदार महिला या बचतगटाशी संबंधित आहेत

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 14:22 IST

संबंधित बातम्या