Suryakumar Yadav And Tilak Varma Investment In Sachin Tendulkar Backed Truuzon Solar: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नुकतेच न्यूझीलंडला धूळ चारत सलग दुसरे आणि एकूण तिसरे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादवला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. तर मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माने संघासाठी फायदेशीर अशा काही खेळी खेळल्या होत्या.

सूर्यकुमार आणि तिलकची कोणत्या कंपनीत गुंतवणूक?

विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर आता हे दोन्ही खेळाडू त्यांच्या गुंतवणूक क्षेत्रातील कामगिरीमुळे चर्चेत आले आहेत. कारण सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने सचिन तेंडुलकर भागीदार असलेल्या एका कंपनीत गुंतवणूक केली आहे.

त्यांनी गुंतवणूक केलेल्या कंपनीचे नाव ट्रूझॉन सोलर असे आहे. सनटेक एनर्जी सिस्टीम्स अंतर्गत कार्यरत असलेल्या सोलर सेवा पुरवणाऱ्या ट्रूझॉन सोलरने नुकतेच सांगितले की, त्यांच्या कंपनीत भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी गुंतवणूक केली आहे.

सूर्यकुमार आणि तिलकबाबत कंपनीचे संस्थापक काय म्हणाले?

“आमच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचा निर्णय आमच्या दृष्टिकोनावर आणि आम्ही अक्षय ऊर्जा क्षेत्रात निर्माण केलेल्या कामावर त्यांचा विश्वास दर्शवितो”, असे ट्रूझॉन सोलरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक चारुगुंडला भवानी सुरेश म्हणाले.

ही माहिती देताना ट्रूझॉन सोलरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक चारुगुंडला भवानी सुरेश यांनी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने किती गुंतवणूक केली आहे, हे मात्र उघड केले नाही.

सचिन तेंडुलकर आणि अभिनेता महेश बाबू

कंपनीने म्हटले आहे की, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आधीच कंपनीमध्ये गुंतवणूकदार आहे, तर अभिनेता महेश बाबू ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करत आहे.

महाराष्ट्रासह पाच राज्यांत कंपनीचे काम

ट्रूझॉन सोलर सध्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत आहे आणि येत्या काही महिन्यांत कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशामध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहे.

ट्रूझॉन सोलरमध्ये सध्या ५८० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीचे पाच राज्यांमध्ये ८२ पेक्षा जास्त चॅनेल पार्टनर्स आणि सर्व्हिस सेंटर्स आहेत.

कंपनीने तंत्रज्ञानावर आधारित ‘आफ्टर-सेल्स सर्व्हिस सॉफ्टवेअर सिस्टम’ देखील कार्यान्वित केली आहे. यामागे निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या वाढत्या ग्राहकवर्गाला जलद तांत्रिक मदत आणि उत्तम सेवा मिळावी हा हेतू आहे.