नवी दिल्ली: ग्राहकांना किराणा माल आणि इतर दैनंदिन वस्तू अवघ्या काही मिनिटांत पोहोचवणाऱ्या ‘स्विगी इंस्टामार्ट’ने  आता एक मोठी घोषणा केली आहे. स्विगीच्या या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मने घरगुती एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी करण्यासाठी ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना आता घरबसल्या इन्स्टंट सिलिंडर ऑर्डर करता येणार आहे.

या नवीन सेवेची सुरुवात एचपीसीएलच्या नुकत्याच लाँच झालेल्या ‘एचपी नव्या’ या १० किलोच्या कंपोझिट एलपीजी सिलिंडरने होणार आहे. ही सेवा सुरुवातीला बेंगळुरू शहरात लाइव्ह केली जाणार असून, तिथे ग्राहक ‘एचपी नव्या’ सिलिंडर ऑर्डर करू शकतील. याशिवाय ५ किलोचा एलपीजी सिलिंडरही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

नवीन कनेक्शनची गरज नाही!

या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यासाठी ग्राहकांकडे आधीपासूनच घरगुती एलपीजी कनेक्शन असणे बंधनकारक नाही. यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि छोट्या कुटुंबांसाठी हा एक सोयीस्कर आणि ऑन-डिमांड पर्याय ठरेल, असे इंस्टामार्टने म्हटले आहे.

अशी होईल डिलिव्हरी आणि बुकिंग:

कशी करावी ऑर्डर?: ग्राहकांना स्विगी इंस्टामार्ट ॲपवर जाऊन त्यांचा पसंतीचा १० किलोचा कंपोझिट किंवा ५ किलोचा सिलिंडर कार्टमध्ये जोडून ऑर्डर करता येईल.पहिली खरेदी आणि रिफिल: पहिली ऑर्डर ही नवीन सिलिंडर खरेदी म्हणून मानली जाईल. त्यानंतर, ग्राहक डिलिव्हरीच्या वेळी रिकामे एचपीसीएल सिलिंडर परत करून ‘रिफिल’ची ऑर्डर देऊ शकतात.

सुरक्षेची काळजी: ही सर्व डिलिव्हरी एचपीसीएलच्या अधिकृत वितरक नेटवर्कद्वारे आणि त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून केली जाईल. तसेच, पहिल्या ऑर्डरसाठी ओळख पडताळणी  आवश्यक असेल.

इंस्टामार्टने विस्तार आता किराणा मालाच्या पलीकडे नेला आहे. एचपीसीएल सोबतच्या या भागीदारीमुळे आम्ही ग्राहकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत, एलपीजी सिलिंडर सारखी अत्यंत आवश्यक सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवत आहोत,” अशी प्रतिक्रिया स्विगी इंस्टामार्टचे सीईओ अमितेश झा यांनी दिली. तर, एचपीसीएलचे मार्केटिंग डायरेक्टर अमित गर्ग म्हणाले की, “इंस्टामार्टच्या वेगवान आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आमचे ‘एचपी नव्या कंपोझिट सिलिंडर’ ग्राहकांसाठी अधिक सुलभ होतील आणि त्यांचा खरेदीचा अनुभव अधिक चांगला होईल.”