हैदराबाद : जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि अनेक तंत्रज्ञान कंपन्यांकडून सुरू असलेल्या कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर देशातील इंजिनीअरसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील आघाडीची दूरसंचार कंपनी T-Mobile ने हैदराबादमध्ये पहिले जागतिक तंत्रज्ञान केंद्र (ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर) सुरू केले असून या केंद्रामार्फत आगामी २०२७ पर्यंत भारतात तब्बल १,००० हून अधिक जणांना रोजगार मिळणार आहे.
कंपनीने हैदराबादच्या हायटेक सिटी परिसरात सुमारे २.५ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र उभारले आहे. हे केंद्र सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, क्लाऊड तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यांसारख्या क्षेत्रांवर काम करणार आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या नवीन नोकरभरती मंदावली असताना, टी-मोबाईलचा हा निर्णय भारतीय बाजारपेठेसाठी ‘मंदीत संधी’ देणारा ठरला आहे.
विशेष म्हणजे, हे केंद्र टी-मोबाईलचे अमेरिकेबाहेरील पहिलेच सर्वात मोठे इनोव्हेशन आणि तंत्रज्ञान केंद्र असणार आहे. भारतातील कुशल तंत्रज्ञान मनुष्यबळ, मजबूत नवोन्मेष परिसंस्था आणि वाढता डिजिटल बाजार लक्षात घेऊन कंपनीने हैदराबादची निवड केली आहे.
कंपनीने अल्पावधीतच ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली असून पुढील वर्षभरात भरतीचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. २०२७ पर्यंत कर्मचारी संख्या १,००० वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
भारतामध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरची वाढ वेगाने होत असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या संशोधन, अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कामकाजासाठी भारताला प्राधान्य देत आहेत. टी-मोबाइलची ही गुंतवणूक त्याच प्रवाहाला बळ देणारी मानली जात आहे.
कोणत्या क्षेत्रांत मिळणार नोकऱ्या?
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग
DevOps आणि क्लाऊड तंत्रज्ञान
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)
डेटा अॅनालिटिक्स
सायबर सुरक्षा
डिजिटल उत्पादन विकास
“भारतातील टॅलेंटवर पूर्ण विश्वास”
“हैदराबाद हे जागतिक दर्जाच्या आयटी टॅलेंटचे केंद्र बनले आहे. टी-मोबाईलच्या या नव्या केंद्रामुळे आमच्या मुख्य व्यावसायिक गरजांना तर गती मिळेलच, शिवाय भारतातील प्रतिभावान तरुणांना जागतिक पातळीवर काम करण्याची संधी मिळेल. २०२७ पर्यंत १,००० हून अधिक उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” – टी-मोबाईल व्यवस्थापन
भारताची ‘जीसीसी’ हब म्हणून घोडदौड कायम
गेल्या काही वर्षांत भारत हा परदेशी कंपन्यांसाठी केवळ ‘बॅक ऑफिस’ न राहता मुख्य तंत्रज्ञान केंद्र (Global Capability Center) म्हणून उदयास आला आहे. टी-मोबाईलच्या या एन्ट्रीमुळे हैदराबादच्या आयटी क्षेत्राला आणखी बळ मिळणार असून, जागतिक मंदीच्या वातावरणातही भारतीय आयटी प्रोफेशनल्सची मागणी कायम असल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतातील आयटी क्षेत्रात मंदीची चर्चा सुरू असतानाच अमेरिकन कंपनीकडून हजारो रोजगारनिर्मितीची घोषणा झाल्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
