Tanishq Consumer Court Case : आपले हक्क आणि अधिकाराविषयी ग्राहकाने किती जागरुक राहिलं पाहिजे, याचं मूर्तीमंत उदाहरण समोर आलं आहे. एका ग्राहकाने प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड ‘तनिष्क’मधून कर्णफुले खरेदी केली होती. यातील एकाचं लॉक सैल असल्याने एक डुल गहाळ झाले. याबाबत ग्राहकाने तनिष्क शोरूममध्ये जाऊन तक्रार दिली. पण, त्यावर काहीच समाधान न मिळाल्याने अखेर त्यांना ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठवाला लागला. या प्रकणात ग्राहक मंचाने दोन्ही बाजू ऐकून अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

कर्णफुल गहाळ होण्यात ज्वेलरी शॉपची काय चूक?

एका महिला ग्राहकाने २७ जुलै २०२२ रोजी तनिष्कच्या शोरुममधून ४३,३५५ रुपयांना सोन्या-हिऱ्याची कर्णफुलाची जोडी खरेदी केली होती. ११ ऑगस्ट २०२२ रोजी रक्षाबंधनानिमित्त त्यांनी हे डुल आपल्या मुलीला भेट दिले. मात्र, दुसऱ्याच दिवशी (१२ ऑगस्ट) त्यातील एक डुल कानातून गळून हरवला. जेव्हा त्यांनी कानात उरलेला दुसरा डुल तपासला, तेव्हा त्याचा लॉक अत्यंत सैल असल्याचे आणि तो नीट बसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. ग्राहकाने तात्काळ तनिष्कच्या शोरुममध्ये धाव घेऊन तक्रार केली. उरलेला डुल तपासणीसाठी मॅन्युफॅक्चररकडे पाठवण्यात आला, पण महिनाभराने “हा दोष दुरुस्त होऊ शकत नाही” असे सांगून कंपनीने हात वर केले.

कंपनीचा ग्राहकावर निष्काळजीपणाचा आरोप

तक्रारदाराने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यावर कंपनीने “ग्राहकाच्या मुलीच्या निष्काळजीपणामुळे डुल हरवला असून मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टचा आरोप खोटा आहे”, असा बचाव केला. ग्राहक मंचाच्या दोन्ही महिला सदस्यांनी न्यायालयात प्रत्यक्ष उरलेल्या डुलाची पाहणी केली. डुलचा लॉक प्रचंड सैल असल्याचे प्रत्यक्ष सिद्ध झाल्याने न्यायालयाने कंपनीला दोषी ठरवून दंडाचा आदेश दिला. मंचाचे अध्यक्ष संजीव जिंदाल आणि महिला सदस्या ज्योती सिवाच व खुशविंदर कौर यांच्या पीठाने १६ जुलै रोजी हा निर्णय दिला.

ग्राहकाला किती भरपाई मिळाली?

कर्णफुलातील हरवलेल्या एका डुलाची किंमत २१,५०० रुपये, मानसिक त्रासापोटी भरपाई १५,००० रुपये आणि कायदेशीर खर्च ११,००० रुपये अशी एकूण ४७,००० रुपये भरपाई देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. न्यायालयाने तनिष्क कंपनी आणि डीलरला संयुक्तपणे ४५ दिवसांच्या आत ही रक्कम देण्यास सांगितले आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाचा धडा

हा निकाल केवळ उत्पादन कंपन्या आणि व्यापाऱ्यांसाठी मोठा इशारा नाही तर ग्राहकांसाठीही मोठा धडा आहे. दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तूंची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे ही केवळ ग्राहकाची नाही, तर ब्रँडची देखील जबाबदारी आहे. तर आपल्या अधिकारांबाबत आपण किती जागरूक असावे याचाही हा वस्तूपाठ आहे.