नवी दिल्ली : भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात टाटा समूहाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. टाटा समूहाची कंपनी ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स’ने तैवानची दिग्गज कंपनी ‘फॉक्सकॉन’ला मागे टाकत भारतातून होणाऱ्या आयफोन निर्यातीत पहिले स्थान पटकावले आहे.

 ‘बिझनेस स्टँडर्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या ५ वर्षांच्या ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ योजनेच्या कालावधीत (आर्थिक वर्ष २०२२ ते २०२६ दरम्यान) टाटा इलेक्ट्रॉनिक्सने फॉक्सकॉनला निर्यातीच्या बाबतीत पिछाडीवर टाकले आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने सुमारे २६.३ अब्ज डॉलर मूल्याच्या आयफोन्सची निर्यात केली. फॉक्सकॉनने सुमारे २५.६ अब्ज डॉलर्स मूल्याच्या आयफोन्सची निर्यात करून दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

फॉक्सकॉनने भारतात २०१९ मध्येच आयफोन असेंब्लीचे काम सुरू केले होते, तर टाटा इलेक्ट्रॉनिक्सने केवळ अडीच वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘विस्ट्रॉन’ कंपनीचा प्रकल्प खरेदी करून या क्षेत्रात प्रवेश केला होता. एवढ्या कमी वेळात ५ वर्षांचा लीड असलेल्या बलाढ्य फॉक्सकॉनला मागे टाकणे, ही टाटासाठी ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.

 एकूण उत्पादनात (घरगुती + निर्यात) अजूनही फॉक्सकॉन पुढे

जरी भारताबाहेर निर्यात करण्यात टाटा आघाडीवर असले, तरी भारतातील देशांतर्गत  बाजारपेठ आणि निर्यात अशा दोन्हीचा एकत्रित विचार केला, तर फॉक्सकॉन अजूनही किरकोळ फरकाने आघाडीवर आहे.

एकूण उत्पादन मूल्य (FY22 – FY26): फॉक्सकॉनने एकूण ३८ अब्ज डॉलर्स मूल्याचे आयफोन तयार केले.
टाटांचा वाटा: टाटा इलेक्ट्रॉनिक्सने ३५.५ अब्ज डॉलर्स मूल्याचे उत्पादन केले असून, एकूण उत्पादनात त्यांचा वाटा ४६.०१% वर पोहोचला आहे.
फॉक्सकॉनने भारतीय बाजारपेठेसाठी सर्वाधिक (१२.४ अब्ज डॉलर्स) आयफोन बनवले, जे टाटाच्या (६.३ अब्ज डॉलर्स) तुलनेत दुप्पट आहेत.

  लढत’ कशी झाली?

सुरुवातीला आयफोन बनवण्यासाठी फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन अशा तीन कंपन्या भारतात कार्यरत होत्या. परंतु, टाटा समूहाने आक्रमक धोरण अवलंबत तैवानच्या कंपन्यांचे भारतीय युनिट्स खरेदी केले. नोव्हेंबर २०२३ मध्ये  विस्ट्रॉनचा कर्नाटकातील प्लांट पूर्णपणे खरेदी केला. जानेवारी २०२५ मध्ये पेगाट्रॉन इंडियामधील ६०% नियंत्रित भागीदारी खरेदी केली.

या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे आणि तामिळनाडूतील होसूर येथील स्वतःच्या प्लांटमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे आता भारतातील आयफोन मॅन्युफॅक्चरिंग ही मुख्यत्वे ‘टाटा विरुद्ध फॉक्सकॉन’ अशी दोन बड्या कंपन्यांमधील थेट लढत बनली आहे.

 ॲपलचा भारतावरील विश्वास वाढला

चीनला पर्याय म्हणून ॲपल  भारताकडे मुख्य केंद्र म्हणून पाहत आहे. २०२६ च्या अखेरीस जगातील एकूण आयफोन उत्पादनापैकी २६% उत्पादन भारतात होण्याची शक्यता आहे. अलीकडेच बाजारात आलेल्या आयफोन १७ (iPhone 17) च्या सुरुवातीच्या उत्पादनात भारताने मोठी भूमिका बजावली आहे.

 सायबर हल्ल्याचे सावट

 सरलेल्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला टाटा इलेक्ट्रॉनिक्सवर झालेल्या एका मोठ्या सायबर हल्ल्याची चौकशी सध्या सुरू आहे. ‘वर्ल्ड लीक्स’ नावाच्या हॅकर ग्रुपने टाटाच्या सिस्टीममधून आगामी ‘आयफोन १८ प्रो’संबंधित काही संवेदनशील डिझाईन्स, सप्लायर्सची यादी आणि ड्रॉप-टेस्टचे व्हिडिओ डार्क वेबवर लीक केले आहेत. केंद्र सरकारच्या ‘सर्ट-इन’  आणि टाटाने यावर तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट आणि कडक तपास सुरू केला आहे. सायबर सुरक्षेचे हे तात्पुरते आव्हान बाजूला ठेवल्यास, टाटा इलेक्ट्रॉनिक्सने जागतिक स्तरावर ‘मेक इन इंडिया’चा डंका वाजवला आहे. एकेकाळी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात मक्तेदारी असलेल्या तैवानच्या कंपन्यांना भारतातच नमवून टाटाने जागतिक पुरवठा साखळीत आपले स्थान मजबूत केले आहे.