पीटीआय, नवी दिल्ली : देशातील आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्सने वाणिज्य वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी १ जुलैपासून वाणिज्य वाहनांच्या संपूर्ण श्रेणीतील किमतींमध्ये २.५ टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. यापूर्वीच कंपनीने प्रवासी वाहनांच्या किमतीही वाढणार असल्याची घोषणा केलेली आहे.

कंपनीने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, किंमतवाढ वाहनाच्या श्रेणी आणि प्रकारानुसार वेगवेगळी असेल. वाढत्या कमॉडिटीच्या किमती आणि इतर इनपुट कॉस्टमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि महागाईचा सततचा दबाव यांचा परिणाम अंशतः भरून काढण्यासाठी किमतीत हा बदल केला जात आहे, असे कंपनीने बाजार मंचाला कळवले आहे.

टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठ्या वाणिज्य वाहन उत्पादकांपैकी एक असून ट्रक, बस, लहान मालवाहू वाहने आणि प्रवासी वाहतूक वाहनांच्या विस्तृत श्रेणीत कंपनीची उपस्थिती आहे. त्यामुळे या किंमतवाढीचा परिणाम वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक क्षेत्रावरही होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही वाहन उद्योगातील अनेक कंपन्यांनी वाढत्या उत्पादन खर्चामुळे वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर कच्च्या मालाच्या किमतींतील वाढ तसेच पुरवठा साखळीवरील दबावामुळे वाहन उत्पादकांवर खर्चाचा ताण कायम आहे.

टाटा कंपनीच्या कारच्या किमतीही वाढणार

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडने देखील १ जुलैपासून प्रवासी वाहनांच्या (पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी सर्व वाहने) आणि विद्युत शक्तीवर (इलेक्ट्रिक-इव्ही) चालणाऱ्या वाहनांच्या किमतीत १.५ टक्क्यांपर्यंत करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स या वाढीचा मोठा भार स्वतः सोसत असली, तरी या बदलाद्वारे त्यातील काही हिस्सा ग्राहकांवरही टाकला जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.