मुंबई : टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडने चौथ्या तिमाहीमध्ये सर्व विभागांत उल्लेखनीय वाढ नोंदवली. मार्च २०२६ मध्ये देशांतर्गत बाजारातील प्रवासी वाहनांची विक्री ६६,१९२ वाहने इतकी झाली, जी मार्च २०२५ मधील ५१,६१६ वाहनांच्या तुलनेत २८ टक्के अधिक वाढ दर्शवते. तिमाहीत देशांतर्गत विक्री १,९८,७४३ वाहनांवर पोहोचली, जी २०२५ च्या चौथ्या तिमाहीमधील १,४६,१२७ वाहनांच्या तुलनेत ३६ टक्के अधिक आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी देशांतर्गत विक्री ६,३१,३८७ वाहने झाली, म्हणजेच आर्थिक वर्ष २५ मधील ५,५३,५८५ वाहनांच्या तुलनेत १४ टक्के वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय व्यवसायात (आयबी) देखील लक्षणीय वाढ झाली. मार्च २०२६ मध्ये विक्री ७७९ वाहनांवर पोहोचली, जी मार्च २०२५ मधील २५६ वाहनांच्या तुलनेत तब्बल २०४ टक्के वाढ दर्शवते आहे. तिमाहीतील आंतरराष्ट्रीय व्यवसायात विक्री २,६२५ वाहने झाली (आर्थिक वर्ष २५च्या चौथ्या तिमाहीमधील ८७२ वाहनांच्या तुलनेत २०१ टक्के वाढ), तर आर्थिक वर्ष२६ साठी विक्री १०,२०० वाहनांवर पोहोचली, जी आर्थिक वर्ष २५ मधील २,६७८ वाहनांच्या तुलनेत २८१ टक्के वाढ दर्शवते.

एकूण प्रवासी वाहनांची विक्री (इलेक्ट्रिक वाहनांसह) मार्च २०२६ मध्ये ६६,९७१ वाहने झाली, जी मार्च २०२५ मधील ५१,८७२ वाहनांच्या तुलनेत २९ टक्के वाढ आहे. आर्थिक वर्ष २६च्या चौथ्या तिमाहीमध्ये एकूण विक्री २,०१,३६८ वाहनांवर पोहोचली, म्हणजेच आर्थिक वर्ष २५च्या चौथ्या तिमाहीमधील १,४६,९९९ वाहनांच्या तुलनेत ३७ टक्के वाढ. वार्षिक स्तरावर आर्थिक वर्ष २६ मध्ये एकूण विक्री ६,४१,५८७ झाली, जी आर्थिक वर्ष २५ मधील ५,५६,२६३ वाहनांच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) विक्रीतही दमदार कामगिरी दिसून आली. मार्च २०२६ मध्ये इव्ही विक्री ९,४९४ वाहने झाली, जी मार्च २०२५ मधील ५,३५३ वाहनांच्या तुलनेत ७७ टक्के वाढ आहे. आर्थिक वर्ष २६च्या चौथ्या तिमाहीमध्ये इव्ही विक्री २६,९३१ झाली (आर्थिक वर्ष २५च्या चौथ्या तिमाही मधील १५,९३६ वाहनांच्या तुलनेत ६९ टक्के वाढ), तर आर्थिक वर्ष २६ मध्ये एकूण इव्ही विक्री ९२,१२० वाहनांवर पोहोचली, जी आर्थिक वर्ष२५ मधील ६४,२७६ च्या तुलनेत ४३ टक्के वाढ दर्शवते.

या वर्षात पीव्ही उद्योगाची विक्री सुमारे ४७ लाख वाहनांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे, जी वर्षागणिक ८ टक्के वाढ दर्शवते. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत उद्योगाने दमदार पुनरागमन करत दुहेरी अंकातील वाढ नोंदवली, ज्याला जीएसटी २.० ची अंमलबजावणी आणि सणासुदीच्या हंगामातील मजबूत मागणीचा आधार मिळाला. ग्राहकांमध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाबाबतची पसंती अधिक वाढली असून, सीएनजी वाहनांची विक्री सुमारे २० टक्के वार्षिक दराने वाढली, तर इव्ही विक्रीने २ लाख वाहनांचा टप्पा ओलांडला. या वाढीमागे इव्हीबाबत वाढलेला ग्राहकांचा विश्वास आणि सर्व प्रमुख ओईएमकडून नवीन उत्पादनांचे सादरीकरण हे घटक कारणीभूत ठरले, असे कंपनीचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्ससाठी आर्थिक वर्ष२०२५-२६ हे अनेक टप्पे गाठणारे ऐतिहासिक वर्ष ठरले. आम्ही ६.४ लाखांहून अधिक वाहनांची आतापर्यंतची सर्वोच्च वार्षिक विक्री नोंदवली, जी उद्योगापेक्षा जास्त १५ टक्के वार्षिक वाढ दर्शवते. सहामाहीत वाहन नोंदणीनुसार आम्ही उद्योगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो. दक्षिण आफ्रिकेत पुन्हा प्रवेश केल्यामुळे आंतरराष्ट्रीय विक्री १०,००० वाहनांहून अधिक झाली. सीएनजी विभागात आमच्या पर्यावरणपूरक पॉवरट्रेनमुळे १.७ लाखांहून अधिक विक्री (२४% वार्षिक वाढ) झाली. इव्ही क्षेत्रात आम्ही नेतृत्व अधिक बळकट करत ४३ टक्के वार्षिक वाढीसह ९२,००० हून अधिक वाहनांची विक्री नोंदवली.

आर्थिक वर्ष २६च्या चौथ्या तिमाहीत आम्ही २ लाख वाहनांचा टप्पा ओलांडत आतापर्यंतची सर्वाधिक तिमाही विक्री साध्य केली, जी ३७ टक्के वार्षिक वाढ दर्शवते. या तिमाहीत इव्ही विक्रीतही विक्रमी कामगिरी करत सुमारे २७,००० वाहनांची विक्री (६९% वार्षिक वाढ) झाली.

पहिल्या सहामाहीमध्ये नेक्‍सॉन आणि पंच हे सर्वाधिक विक्री झालेले एसयूव्ही मॉडेल्स ठरले, ज्यातून आमच्या एसयूव्ही पोर्टफोलिओची ताकद स्पष्ट होते. हॅचबॅक सेगमेंटमधील उद्योगापेक्षा जास्त वाढ ग्राहकांची पसंती दर्शवते. सिएरा, सुधारित पंच तसेच हॅरियर आणि सफारीच्या पेट्रोल व्हर्जन्सना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, जो बुकिंग, चौकशी आणि डिलिव्हरीमध्ये दिसून येतो.

पुढील काळात एसयूव्ही, सीएनजी आणि इव्ही विभागातील वाढीमुळे उद्योगाची गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी भू-राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे राहील. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आर्थिक वर्ष २७ मध्येही अर्धवार्षिकमधील मजबूत गतीवर आधारित उद्योगापेक्षा जास्त वाढ साध्य करण्यास उत्सुक आहे, ज्याला नवीन उत्पादनांची पाइपलाइन आणि मल्टी-पॉवरट्रेन धोरणाचा आधार मिळेल.”