मुंबई : मीठ ते सॉफ्टवेअर उद्योगापर्यंत विस्तारलेल्या टाटा समूहाची नियंत्रक कंपनी असलेल्या टाटा सन्सची महत्त्वाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पुरेशा गणपूर्तीअभावी तहकूब करावी लागली. अंतर्गत वादाने ग्रस्त असलेल्या देशातील या सर्वात प्रतिष्ठित उद्योग समूहाला आपल्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये नियोजित कार्यकाळ संपल्यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पुनर्नियुक्ती नाकारल्याची माहिती समोर आल्यानंतर, अवघ्या आठवड्याभरातच टाटा समूहाच्या दृष्टीने हा दुसरा धक्का मानला जात आहे.
टाटा सन्समध्ये सर्वाधिक मालकी राखणाऱ्या दोन न्यासांच्या प्रतिनिधींची सभेला अनुपस्थिती आणि परिणामी गणपूर्तीअभावी सभा तहकुबीचा निर्णय घ्यावा लागला, असे सूत्रांनी सांगितले. सर दोराबजी टाटा ट्रस्ट (एसडीटीटी) आणि सर रतन टाटा ट्रस्टचे (एसआरटीटी) या न्यासांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांच्या गैरहजेरीमागे महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी या न्यासांवर घातलेले निर्बंध हे कारण आहे.
धर्मादाय आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशांमुळे या न्यासांवर अनेक कठोर निर्बंध आहेत. ज्यात त्यांना कोणतेही मोठे निर्णय न घेण्यास किंवा सभा न घेण्यास सूचित केले गेले आहे. हे निर्बंध घातले जाण्यामागे प्रामुख्याने विश्वस्त मंडळातील अंतर्गत वाद, कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि न्यासांच्या प्रशासनाविरोधात मिळालेल्या तक्रारी ही मुख्य कारणे आहेत. त्याबद्दल सुनावणी आणि निवाडा अद्याप प्रलंबित आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा सन्सच्या संचालकांपैकी एन. चंद्रशेखरन आणि अनिता जॉर्ज हे दक्षिण मुंबईतील समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये उपस्थित होते, तर टाटा न्यासांचे अध्यक्ष नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन या बैठकीत दूरस्थ माध्यमातून (व्हर्चुअल) पद्धतीने सामील झाले होते.
