Mehli Mistry vs Tata Trusts : टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’साठी ८ मे हा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या दिवशी होणाऱ्या महत्त्वाच्या बोर्ड बैठकीत विश्वस्तांचे प्रतिनिधित्व आणि टाटा सन्सच्या संभाव्य ‘लिस्टिंग’बाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ५ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीवरून मोठा पेच निर्माण झाला होता. वेणु श्रीनिवासन आणि विजय सिंह यांच्या फेरनियुक्तीला ट्रस्टच्या दोन महत्त्वाच्या सदस्यांनी विरोध केल्याने मोठी नामुष्की ओढावली. यापैकी टाटा ट्रस्टचे माजी विश्वस्त मेहली मिस्त्री आपण विरोधात मतदान का केले? यावर पहिल्यांदाच बोलले आहेत.

‘माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता’ – मेहली मिस्त्री

एआयनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मेहली मिस्त्री यांनी टाटा ट्रस्टचे सीईओ सिद्धार्थ शर्मा यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मिस्त्री यांनी सांगितले, की, श्रीनिवासन आणि सिंग यांच्या फेरनियुक्तीला विरोध करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता. “मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. याचे सविस्तर कारण ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’शी संबंधित ‘चेंज रिपोर्ट’ला उत्तर म्हणून दाखल केलेल्या शपथपत्रात दिले आहे,” असे मिस्त्री यांनी पत्रात नमूद केले आहे.

फेरनियुक्तीचा ठराव का फेटाळला गेला?

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० नुसार, विश्वस्तांच्या फेरनियुक्तीसाठी सर्वसंमती असणे आवश्यक असते. मेहली मिस्त्री आणि जे. एन. मिस्त्री या दोन सदस्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे ही सर्वसंमती होऊ शकली नाही. परिणामी, वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांचा कार्यकाळ आता १० मे रोजी समाप्त होणार असल्याचे सीईओ सिद्धार्थ शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासकीय गैरव्यवहाराचे आरोप

मेहली मिस्त्री यांनी टाटा ट्रस्टच्या कारभारात ‘गैरप्रशासन’ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विश्वस्तांनी यापूर्वी त्यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने मतदान करून त्यांना ट्रस्टबाहेर काढले. वेणू श्रीनिवासन यांचा कार्यकाळ संपलेला असतानाही त्यांनी अनधिकृतपणे मतदानात सहभाग घेतल्याचा दावा त्यांनी केला. मिस्त्री यांनी इतर विश्वस्तांनी नक्की कसे मतदान केले? याची माहितीही सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

टाटा समूहातील नेमका वाद काय?

नोव्हेंबर २०२५ मध्ये हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा मेहली मिस्त्री यांना विश्वस्त पदावरून हटवण्यात आले. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांना आजीवन विश्वस्त पद देण्याचा ठराव झाला असतानाही, नंतर त्यांना मतदानाव्दारे बाहेर काढण्यात आले. यानंतर मिस्त्री यांनी वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांच्या पात्रतेवर ‘बाई हिराबाई जमशेदजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन’मध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या आक्षेपानंतर २४ तासांच्या आत श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला होता, मात्र विजय सिंग अजूनही तिथे कार्यरत आहेत.

८ मे च्या बैठकीचा अजेंडा काय?

या वादाच्या पार्श्वभूमीवर, येत्या ८ मे रोजी टाटा ट्रस्ट्सची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत टाटा सन्सच्या बोर्डावरील ट्रस्टच्या प्रतिनिधींच्या नियुक्तीचा आढावा घेतला जाणार आहे. टाटा सन्सचे आजीवन विश्वस्त नोएल टाटा यांनी अद्याप या विषयावर आपले मत व्यक्त केलेले नाही, त्यामुळे या संपूर्ण वादात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार टाटा सन्सला सार्वजनिक कंपनी म्हणून शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याबाबत अंतिम निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.