मुंबई : टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संभाव्य समभाग सूचिबद्धतेचा (लिस्टिंग) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. २६ मे रोजी झालेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडे कंपनीच्या सूचिबद्धतेच्या त्यांच्या वैयक्तिक भूमिकेबाबत स्पष्टता मागितल्याचे वृत्त आहे.

एक वृत्तसंस्थेनुसार, बैठकीदरम्यान टाटा समूहातील तोट्यात असलेल्या पण दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या व्यवसायांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एअर इंडिया, टाटा इलेक्ट्रॉनिक्स तसेच समूहाच्या डिजिटल व्यवसायांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगिरी, गुंतवणूक आणि नफ्याच्या कालमर्यादेबाबत माहिती दिली.

याच बैठकीत नोएल टाटा यांनी टाटा सन्सच्या संभाव्य सूचिबद्धतेबाबत चंद्रशेखरन यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, टाटा सन्सच्या सूचिबद्धतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या रिझर्व्ह बँकेला पटवून देण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत, याचीही माहिती मागितल्याचे समजते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार चंद्रशेखरन यांनी या विषयावर कोणतीही ठोस भूमिका व्यक्त केली नाही. त्यांच्या या अलिप्त भूमिकेमुळे टाटा समूहातील प्रमुख भागधारकांमध्ये या विषयावर मतभेद असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

टाटा सन्समधील बहुसंख्य हिस्सा टाटा ट्रस्ट्सकडे असल्याने हा मुद्दा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी जुलैमध्ये टाटा ट्रस्ट्सच्या विश्वस्त मंडळाने टाटा सन्सच्या सूचिबद्धतेला विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर केल्याचे सांगितले जाते. नोएल टाटा हेही सूचिबद्धतेचच्या विरोधात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

तथापि, अलीकडील काळात या विषयावर वेगवेगळी मते समोर आली आहेत. विश्वस्तांपैकी वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांनी टाटा सन्सच्या सूचिबद्धतेचा पर्याय तपासण्यास समर्थन दर्शविल्याचे वृत्त आहे. त्यांच्या मते, सूचिबद्धतेमुळे पारदर्शकता, कॉर्पोरेट प्रशासनाची गुणवत्ता आणि भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती वाढू शकते. दरम्यान, २६ मेच्या बैठकीत एअर इंडिया, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल व्यवसायांतील मोठ्या गुंतवणुकीनंतरही हे उपक्रम अद्याप तोट्यात का आहेत, याचे स्पष्टीकरण व्यवस्थापनाने दिले. नव्या व्यवसाय आराखड्याऐवजी या गुंतवणुकींच्या दीर्घकालीन धोरणात्मक महत्त्वावर भर देण्यात आला.

आता ८ जून रोजी होणाऱ्या टाटा ट्रस्ट्सच्या बैठकीतही अशाच प्रकारची सादरीकरणे होणार असून, नेतृत्व, प्रशासन आणि धोरणात्मक दिशेबाबत पुढील चर्चांचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यानंतर १२ जूनला टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्यात चंद्रशेखरन यांच्या संभाव्य पुनर्नियुक्तीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्सकडून या वृत्तावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.