Tata Sons N Chandrasekaran Reappointment: टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्ट्सने एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीच्या प्रस्तावाच्या बाजूने टाटा सन्सच्या चार संचालकांनी मतदान केले. तर टाटा ट्रस्ट्सचे संचालक नोएल टाटा यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.
टाटा सन्सच्या ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’मधील नियमांनुसार हा प्रस्ताव कायदेशीरदृष्ट्या वैध नसल्याचे टाटा ट्रस्ट्सने म्हटले आहे. “टाटा सन्सच्या नियमांनुसार अध्यक्षाची नियुक्ती करण्यासाठी ट्रस्टच्या दोन्ही नामनिर्देशित संचालकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक आहे. हा नियम नवीन अध्यक्षाची नियुक्ती असो किंवा विद्यमान अध्यक्षाची फेरनियुक्ती असो, दोन्ही परिस्थितीत लागू होतो”, असे टाटा ट्रस्ट्सने म्हटले आहे.
ट्रस्टचे दोन्ही नामनिर्देशित संचालक उपस्थित नसतील तर अध्यक्षाच्या नियुक्ती किंवा फेरनियुक्तीबाबत संचालक मंडळाची बैठक घेता येत नाही. तसेच दोन्ही संचालकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याशिवाय असा प्रस्ताव मंजूरही करता येत नाही, असेही टाटा ट्रस्ट्सने म्हटले आहे. दरम्यान, वेंकटरामन ‘वेनू’ श्रीनिवासन आणि नोएल टाटा हे टाटा ट्रस्ट्सचे टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नामनिर्देशित संचालक आहेत.
नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीच्या प्रस्तावाला विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव कायदेशीरदृष्ट्या रद्द ठरतो आणि त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही, असे टाटा ट्रस्ट्सने म्हटले आहे. चंद्रशेखरन यांनी त्यांचा कार्यकाळ २० फेब्रुवारी २०२७ रोजी संपल्यानंतर पुन्हा अध्यक्षपदासाठी अर्ज न करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय त्यांनी स्वतः घेतला असून तो टाटा ट्रस्ट्सने स्वीकारला आहे. हा निर्णय आता अंतिम असल्याचेही ट्रस्ट्सने स्पष्ट केले.
“१२ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाला आपण पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे कळवले होते. हा निर्णय त्यांनी स्वतःच्या इच्छेने घेतला होता. तो कोणत्याही फेरआढावा प्रक्रियेचा भाग नव्हता”, असे टाटा ट्रस्ट्सने म्हटले आहे.
चंद्रशेखरन यांचा हा निर्णय सार्वजनिक करण्यात आला, मात्र त्यापूर्वी कंपनीच्या भागधारकांना याबाबत माहिती देण्यात आली नव्हती किंवा त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नव्हती, असे ट्रस्ट्सने म्हटले आहे. एकदा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर तो मागे घेता येत नाही. कारण टाटा समूहातील कर्मचारी, कंपनीला कर्ज देणाऱ्या संस्था, व्यावसायिक भागीदार, बाजारपेठ आणि कंपनीतील सर्वात मोठा भागधारक या सर्वांनी त्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया सुरू केली आहे, असे टाटा ट्रस्ट्सने स्पष्ट केले.
चंद्रशेखरन यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टाटा ट्रस्ट्सने तो स्वीकारला. तसेच चंद्रशेखरन यांच्यानंतर नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा सल्ला टाटा सन्सला दिला, असे ट्रस्ट्सने सांगितले. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीबाबत त्यांची भूमिका अद्याप बदललेली नाही. ही भूमिका कंपनीतील बहुसंख्य भागधारक म्हणून विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा ट्रस्ट्सच्या अध्यक्षांनीही हीच भूमिका पुन्हा स्पष्ट केली, असे टाटा ट्रस्ट्सने म्हटले आहे.
दरम्यान, नोएल टाटा यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडून घेतलेले कायदेशीर मतही बैठकीत सांगितले. टाटा ट्रस्ट्सची भूमिका योग्य असल्याचे या कायदेशीर मतातून स्पष्ट होते, असे सांगण्यात आले. मात्र, संचालक मंडळाने या मताची दखल घेतली नाही, असा दावा टाटा ट्रस्ट्सने केला.
