रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च स्तरातील (अप्पर लेअर) बँकेतर वित्तीय कंपन्यांच्या (एनबीएफसी) यादीत टाटा सन्सचे स्थान कायम ठेवले आहे. या यादीतील समावेशामुळे एनबीएफसी नोंदणी रद्द करण्याच्या कंपनीच्या प्रलंबित अर्जावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च स्तरातील बँकेतर वित्तीय कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १७ कंपन्यांचा समावेश आहे. महत्वाच्या बँकेतर वित्तीय कंपन्या आणि मूळ गुंतवणूक कंपन्यांना नियामक चौकट वाढविण्याच्या हेतू यामागे आहे.

टाटा सन्स ही ४०० अब्ज डॉलरच्या टाटा समूहाची पालक कंपनी असून, तिला २०२२ मध्ये सर्वोच्च स्तरातील बँकेतर वित्तीय कंपनी श्रेणीत टाकण्यात आले. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, टाटा सन्सने नोंदणी रद्द करण्यासाठी केलेला अर्ज प्रलंबित असून, या यादीतील कंपनीच्या समावेशाचा निर्णय कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय घेतलेला आहे.

सर्वोच्च स्तरातील बँकेतर वित्तीय कंपनी असल्याने टाटा सन्सला कठोर नियामक चौकटीला सामोरे जावे लागणार आहे. त्यात भांडवली बाजारातील सूचिबद्धतेसह प्रशासन, भांडवल आणि इतर नियमांचे पालन अधिक काटेकोरपणे करावे लागेल. या पार्श्वभूमीवर टाटा सन्सने समूहाची पुनर्रचना करण्याचे पाऊल उचलून रिझर्व्ह बँकेकडे या श्रेणीतून वगळण्याची मागणी केली होती. याचबरोबर टाटा सन्सने कर्जाच बोजा कमी करण्यासह वित्तीय सेवा व्यवसायाची पुनर्रचना करण्यास सुरूवात केली. त्यात वित्तीय कामकाज आणि मूळ गुंतवणूक कामकाज या दोन गोष्टी स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्वोच्च स्तरातील बँकेतर वित्तीय कंपन्याआरईसी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, टाटा कॅपिटल, टाटा सन्स, मुथूट फायनान्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलमपेंट कॉर्पोरेशन, महिंद्रा अँड महिद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, एल अँड टी फायनान्स, बजाज हाऊसिंग फायनान्स, एचबीडी फायनान्शियल सर्व्हिसेस, पिरामल फायनान्स.