मुंबई: टाटा समूहाशी संलग्न प्रमुख धर्मादाय न्यास असलेल्या ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’चे विश्वस्त वेणू श्रीनिवासन यांनी टाटा न्यासांमधील कथित प्रशासकीय त्रुटींची महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांमार्फत तातडीने चौकशीची मागणी बुधवारी केली. कारभाराच्या चौकशीसह, विश्वस्त मंडळाच्या रचनेबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.टाटा समूहाची मुख्य नियंत्रक कंपनी अर्थात टाटा सन्समध्ये सुमारे ६६ टक्के मालकी हिस्सा हा टाटा ट्रस्ट्सच्या विविध विश्वस्त न्यासांकडे आहे. ज्यापैकी ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ ही सर्वात जुनी, १९३२ साली स्थापित प्रमुख सेवाभावी संस्था आहे. त्यावर विश्वस्त म्हणून कार्यरत श्रीनिवासन यांनी धर्मादाय आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात, नोएल टाटा यांची ट्रस्टवरील विश्वस्त म्हणून कायमस्वरूपी पद कायम ठेवण्याचा निर्णय, तसेच त्यांचेच पुत्र असलेल्या नेव्हिल टाटा यांची विश्वस्तपदी झालेल्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

श्रीनिवास हे टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील टाटा ट्रस्टकडून नामनिर्देशित झालेले संचालक असून, त्यांना तेथे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या भूमिकेवर मर्यादा आणल्या गेल्याचाही त्यांचा आरोप आहे. नोएल टाटा यांनी टाटा सन्सच्या प्रस्तावित सूचबद्धतेच्या मुद्यावर अनुकूल मतदान करण्यापासून आपल्याला रोखल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

टाटा सन्सच्या सूचिबद्धतेवरून वादटाटा सन्सची प्रस्तावित शेअर बाजारातील सूचिबद्धता हा या वादाच्या मूळाशी आहे. १६ सप्टेंबर रोजी सर दोराबजी टाटा ट्रस्टकडून केला गेलेला ठराव म्हणजे, आपली स्वतंत्र निर्णयक्षमता आणि मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा एक असामान्य प्रयत्न होता, असे वेणू श्रीनिवासन यांनी तक्रार पत्रात म्हटले आहे. यामुळे ट्रस्टमधील निर्णयक्षमता मोजक्या विश्वस्तांच्या हातात केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर १७ सप्टेंबर रोजी झालेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत श्रीनिवासन यांनी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठीच्या पुनर्नियुक्तीला तसेच टाटा सन्सची सूचिबद्धता पुढे नेण्यास पाठिंबा दिला. त्याउलट, नोएल टाटा यांनी या दोन्ही प्रस्तावांना विरोध केला. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवरील ठरावाच्या मंजुरत श्रीनिवास यांचे मत निर्णायक ठरले. टाटा ट्रस्टने मात्र त्यानंतर या संचालक मंडळाच्या निर्णयांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला. अशा महत्त्वाच्या निर्णयांवर ट्रस्टचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन संचालकांनी परस्पर सहमतीने निर्णय घेणे आवश्यक होते अशी भूमिकाही मांडली.

विश्वस्त मंडळाच्या रचनेवर आक्षेप

श्रीनिवासन यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्टवर नोएल टाटा यांची कायमस्वरूपी विश्वस्त म्हणून नियुक्ती आणि नेव्हिल टाटा यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती कोणत्या परिस्थितीत झाली, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात नोएल टाटा (फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रथम नियुक्त आणि कायमस्वरूपी कार्यकाळ), श्रीनिवासन (कार्यकाळ १२ नोव्हेंबर २०२८ पर्यंत), विजय सिंग (१३ जुलै २०२७ पर्यंत), दरायस खंबाटा (९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत), नेव्हिल एन. टाटा (कार्यकाळ १२ नोव्हेंबर २०२८ पर्यंत) आणि भास्कर भट (कार्यकाळ १२ नोव्हेंबर २०२८ पर्यंत) यांचा समावेश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, नोएल टाटा यांनी टाटा सन्सच्या कोणत्याही सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी ट्रस्टकडून नामनिर्देशित प्रतिनिधी, प्रॉक्सी किंवा अन्य प्रतिनिधीची नियुक्ती, अधिकृतता किंवा सूचना देण्यासंदर्भातील कोणत्याही बैठकीत सहभागी होऊ नये, अशी निर्देशाची मागणीही श्रीनिवासन यांनी केली आहे.