Tata Zudio business strategy : तुम्हाला ग्राहकांची नस समजली तर ग्राहक तुमच्या उत्पादनाची फ्रीमध्ये जाहिरात करतात. अशा उत्पादनाला मग मोठ्या ‘ब्रँडनामा’ची गरज भासत नाही. देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या टाटाचे ‘झुडिओ’ याचं उत्तम उदाहरण आहे. टाटा समूहाच्या ट्रेंट ब्रँड अंतर्गत येणाऱ्या झुडिओने अत्यंत कमी वेळेत भारतीय रिटेल क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. विशेष म्हणजे स्वस्त कपडे विकूनही झुडिओ नफा कमवण्यात ट्रेंटमध्ये अव्वल आहे. स्वस्तात कपड्यांची विक्री करुनही झुडिओची बक्कळ कमाई कशी होते? असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे. यापाठीमागे आहे टाटा समूहाची एक सोपी बिझनेस स्ट्रॅटेजी.
१. झुडिओचा व्हॉल्यूम गेम आणि कमी प्रॉफिट मार्जिन
भारतात संख्येने सर्वात मोठा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग आहे. या श्रेणीतील ग्राहकांना मॉल संस्कृतीचे कायम आकर्षण राहिले आहे. मात्र, मॉल्समधील कपडे अनेकदा त्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे भारतासारख्या देशात सेल्समध्ये स्वस्तात कपडे खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी होते. हीच गरज ओळखून टाटा समूहाने एक स्ट्रॅटेजी आखली आणि झुडीओचा जन्म झाला. ग्राहकांना मॉल्ससारखा अनुभव देत स्वस्तात कपडे उपलब्ध करुन दिली. झुडिओ एका कपड्यामागे कमी नफा कमावते, पण त्यांची विक्री प्रचंड प्रमाणात होते. ‘कमी नफा, पण जास्त विक्री’ या तत्त्वावर काम केल्याने एकूण नफ्याची रक्कम मोठी होते.
२. झुडिओची वेगाने बदलणारी फॅशन
झुडीओमध्ये तुम्ही जात असाल तर एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की इथे फॅशन फार वेगाने बदलते. झुडिओ बाजारातील नवीन ट्रेंड्स खूप लवकर पकडते. एक डिझाइन बाजारात आणल्यापासून ते विकले जाईपर्यंत झुडिओ खूप कमी वेळ घेते. कपडे दुकानात जास्त काळ पडून राहत नाहीत, ज्यामुळे ‘डेड स्टॉक’चा खर्च वाचतो. ग्राहकांनाही स्वस्तात वेगाने बदलणारी फॅशन ट्रेंड फोलो करण्यास मदत होते.
३. झुडिओचा शून्य जाहिरात खर्च
जिथे इतर कंपन्या आणि मोठे ब्रँड कोट्यवधी रुपये खर्च करतात, तिथे झुडिओ जाहिरातींवर १ रुपयाही खर्च करत नाही. ग्राहकच कपड्यांची किंमत आणि क्वालिटी पाहून इतरांना सांगतात. इन्स्टाग्रामवरील रिल्स आणि Zudio Haul व्हिडिओंमुळे ग्राहकांकडूनच मोफत प्रसिद्धी मिळते. या वाचलेल्या पैशातून झुडीओला स्वस्तात उत्पादने विकण्यासही मोठी मदत मिळते.
४. इन-हाउस डिझायनिंग आणि बल्क मॅन्युफॅक्चरिंग
अनेक कपड्यांचे ब्रँड स्वतः उत्पादन करत नाहीत. परिणामी खर्च वाढतो आणि कपड्यांचे किमतीही महाग होता. याउलट डिझाइनपासून ते उत्पादनापर्यंत सर्व प्रक्रिया झुडीओ स्वतः हाताळते. कच्चा माल आणि कपडे खूप मोठ्या प्रमाणात तयार करून घेतले जातात, ज्यामुळे प्रति-कपडा उत्पादनाचा खर्च अत्यंत कमी येतो.
५. मेट्रो शहरांपेक्षा टियर-२ आणि टियर-३ शहरांवर जास्त फोकस
झुडिओ अनेक ठिकाणी पैशाची बचत करुन त्याचा थेट फायदा ग्राहकांपर्यंच पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मॉलच्या मध्यभागी महागड्या जागा घेण्याऐवजी झुडिओ गर्दीच्या ठिकाणी किंवा दुय्यम मोक्याच्या ठिकाणी स्टोअर्स उघडते, जिथे भाडे कमी असते. झुडिओमध्ये सेल्समन तुमच्या मागे फिरत नाहीत. ‘सेल-सर्व्हिस’ मॉडेलमुळे स्टोअर चालवण्याचा खर्च खूप कमी येतो. झुडिओ ब्रँडचे यश टियर-२ आणि टियर-३ शहरांवर जास्त अवलंबून आहे. मेट्रो शहरांच्या तुलनेत लहान शहरांमध्ये झुडिओची वाढ वेगाने होत असून, त्यांच्या जवळपास ८५% नवीन दुकाने लहान आणि विकसनशील शहरांमध्ये आहेत.
जाहिरातींवरील बचत, स्वस्त उत्पादन आणि वेगाने होणारी विक्री या त्रिसूत्रीमुळे झुडिओ कमी किमतीत कपडे देऊनही अब्जावधींचा नफा कमावत आहे.
