TCS, Infosys Advisory For Employees Amid US Israel Iran War: भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने मध्य पूर्वेतील त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक सावधगिरीचा सल्ला जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांना घरातच राहण्यास आणि प्रदेशातील भू-राजकीय तणाव वाढत असताना अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले आहे.
कर्मचाऱ्यांबरोबरच्या अंतर्गत पत्रव्यवहारात कंपनीने म्हटले आहे की मध्य पूर्वेत असलेल्या कंपनीशी संबंधित सर्वांना घरातच राहण्याचा, स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा आणि प्रदेशात किंवा बाहेर प्रवास करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विमान वाहतूक खंडित झाल्यामुळे अनेक देशांमधील हवाई क्षेत्र बंद असल्याने, टीसीएसने मध्य पूर्वेकडे येणारे आणि जाणारे सर्व व्यावसायिक प्रवास निलंबित केले आहेत.
कंपनीने कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, विशेषतः बाधित आणि शेजारच्या प्रदेशात अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या-त्या देशांतील नेतृत्व आणि एचआर पथकांना सक्रिय केले आहे. बाधित कर्मचाऱ्यांशी प्राधान्याने संपर्क साधण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कॉल ट्री सेवा सुरू करण्यात आली आहे.
टीसीएसने म्हटले आहे की त्यांचे एचआर आणि कंट्री लीडरशिप टीम विविध ठिकाणी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहेत. कंपनी स्थानिक अधिकारी आणि भारतीय दूतावासांशी समन्वय साधत आहे, जेणेकरून परिस्थिती बदलत असताना घडामोडींची माहिती घेता येईल. यावेळी कंपनीने त्यांचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे.
टीसीएसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका (MENA) प्रदेशात त्यांचे ९,१०० हून अधिक कर्मचारी आहेत, जे ११ उद्योगांमधील १५० हून अधिक ग्राहकांना सेवा देतात.
इन्फोसिसकडूनही कर्मचाऱ्यांना इशारा
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षाचा आपल्या कर्मचाऱ्यांना कोणताही फटका बसून नये यासाठी टीसीएस प्रमाणेच कर्मचाऱ्यांना सल्ला जारी केला आहे.
इन्फोसिस आणि एचसीएलटेकचे अधिकारी अबू धाबी आणि दुबईमध्ये अडकले
दरम्यान, इन्फोसिस आणि एचसीएलटेक सारख्या इतर प्रमुख आयटी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी अबू धाबी आणि दुबईमध्ये अडकल्याचे वृत्त आहे. ते बार्सिलोना येथे होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्षामुळे विमान वाहतूक स्थगित करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इस्रायली सैन्याने इराणवर संयुक्त हल्ले केले, त्यानंतर इराणने या प्रदेशातील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. त्यानंतर दुबई, दोहा, अबू धाबी, मनामा आणि रियाध यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये हल्ले झाल्याची नोंद झाली, ज्यामुळे तणाव आणखी वाढला आणि मध्य पूर्वेतील हवाई प्रवास विस्कळीत झाला.
