मुंबई : माहिती-तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘टेक महिंद्रा’कडून (Tech Mahindra) कॅम्पस प्लेसमेंट अंतर्गत निवड झालेल्या महाराष्ट्रातील हजारो नवोदित (Fresher) इंजिनिअर्सच्या नियुक्तीला मोठा विलंब होत असल्याचे समोर आले आहे. २०२५ च्या बॅचमधील १,००० हून अधिक विद्यार्थ्यांना कंपनीत निवड होऊन वर्ष उलटले तरी अजूनही अधिकृत ‘ऑफर लेटर’ आणि रुजू होण्याची तारीख (Joining Date) मिळालेली नाही, असे वृत्त ‘मनीकंट्रोल’ने दिले आहे.
पुणे आणि महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही निवड प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू झाली होती. जानेवारी २०२५ मध्ये अॅप्टिट्युड टेस्ट आणि फेब्रुवारीत पुण्याच्या कार्यालयात तांत्रिक व एचआर (HR) इंटरव्ह्यू पार पडले. मार्च २०२५ मध्ये अंतिम निवड यादी जाहीर झाली. निवड होऊन आता वर्ष उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना औपचारिक ऑफर लेटर मिळालेले नाही. सुरुवातीला कॉलेजच्या प्लेसमेंट सेलने आयटी क्षेत्रातील संथ प्रक्रियेमुळे थोडा विलंब होईल असे सांगितले होते, परंतु इतर कंपन्यांमध्ये निवड झालेले त्यांचे वर्गमित्र ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ पर्यंत कामावर रुजू झाले आहेत, तर टेक महिंद्राचे विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
अधिकारी तुपाशी, नवोदित इंजिनिअर उपाशी
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘टेक महिंद्रा’ने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक मोहित जोशी यांच्या वार्षिक मानधनात घसघशीत वाढ केली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५-२६ (FY26) मध्ये जोशी यांचे एकूण वेतन ११.७६ टक्क्यांनी वाढून ६७.५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
मानधनात मोठी वाढ: आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मोहित जोशी यांचे मानधन ६०.४ कोटी रुपये होते, जे आता ११.७६ टक्क्यांच्या वाढीसह ६७.५ कोटी रुपये झाले आहे. या एकूण पॅकेजमध्ये मूळ वेतन, भत्ते, कामगिरीवर आधारित बोनस आणि ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स’ (ESOPs) चा समावेश आहे. आयटी क्षेत्रातील इतर दिग्गजांशी तुलना: या वाढीसह मोहित जोशी हे आता भारतीय आयटी क्षेत्रातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आघाडीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पंक्तीत सामील झाले आहेत.
कंपनीच्या कामगिरीशी सांगड
मोहित जोशी यांनी टेक महिंद्राची धुरा हाती घेतल्यापासून कंपनीत अंतर्गत पातळीवर अनेक मोठे धोरणात्मक बदल केले आहेत. जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रासाठी आव्हानात्मक काळ असतानाही, कंपनीने प्रगतीचा आलेख कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विश्लेषकांच्या मते, कॉर्पोरेट जगतात बड्या पदांवरील अधिकाऱ्यांचे मानधन हे प्रामुख्याने कंपनीची दीर्घकालीन उद्दिष्टे आणि बाजारातील कामगिरीशी जोडलेले असते, आणि जोशी यांच्या मानधनातील ही वाढ याच प्रक्रियेचा भाग आहे.
कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उत्पादकता वाढ लक्षात घेऊन कर्मचारी पुनर्रचना प्रक्रियेअंतर्गत निवडक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चपर्यंत नव्या उमेदवारांच्या नियुक्ती प्रक्रियेत विलंब झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधील २०२५ बॅचमधील १,००० हून अधिक विद्यार्थ्यांना ऑफर लेटरची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वृत्त समोर आले होते.
दरम्यान, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वेतनाशी तुलना केली असता, के. कृतिवासन यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २८ कोटी रुपये वेतन मिळाले, तर सलील पारेख यांचे वेतन ८२.६ कोटी रुपये होते. तसेच श्रीनिवास पल्लिया यांना ४९.६ कोटी रुपये मिळाले.
नियुक्ती विलंबाची मुख्य कारणे
आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हा केवळ एका कंपनीचा विषय नसून संपूर्ण भारतीय आयटी आउटसोर्सिंग क्षेत्रातील मंदीचे सावट आहे.
– मार्जिन सुधारण्यावर भर: जागतिक स्तरावर मंदीचे वातावरण असल्याने टेक महिंद्राने आपले ऑपरेटिंग मार्जिन सुधारण्यासाठी आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पूर्ण वापर करण्यासाठी नवीन भरतीचा वेग कमी केला आहे.
– ‘AI’ चा वाढता प्रभाव: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या विकासामुळे उत्पादकतेत वाढ झाली असून, कंपन्या आता मोठ्या संख्येने फ्रेशर्सची भरती करण्याऐवजी निवडक भरतीला प्राधान्य देत आहेत.
– उद्दिष्टांमध्ये कपात: कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मोहित जोशी यांच्या पुनर्रचना योजनेनुसार, कंपनीने या आर्थिक वर्षात फ्रेशर्सच्या भरतीचे उद्दिष्ट मागील वर्षाच्या (६,००० फ्रेशर्स) तुलनेत बरेच कमी ठेवले आहे.
कंपनीचे म्हणणे काय?
या संदर्भात टेक महिंद्राच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे की, कंपनी कॅम्पसमध्ये दिलेल्या आश्वासनांवर ठाम आहे. परंतु, बाजारातील मागणी आणि व्यावसायिक गरजेनुसार टप्प्याटप्प्याने ऑफर लेटर दिले जात आहेत.
