Adidas India Tech Hub Layoffs : जागतिक तंत्रज्ञान कंपनी ओरॅकलने मंगळवारी (१५ स्पटेंबर २०२६) २,५०० कर्मचाऱ्यांना कमी केले. ही घटना ताजी असताना आता उत्पादन क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध क्रीडा पादत्राणे आणि कपडे बनवणारी जागतिक ब्रँड कंपनी ‘अदिदास’ने भारतात ५० टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने गुडगाव येथील आपल्या ‘इंडिया टेक हब’मध्ये ही कपात सुरू केली आहे. या निर्णयामुळे या हबमधील जवळपास ३०० ते ३५० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. मंगळवारी (१५ सप्टेंबर) पार पडलेल्या एका टाउन हॉल बैठकीत कंपनीने या कर्मचारी कपातीची अधिकृत घोषणा केली.
कोणत्या विभागातील कर्मचारी कपात?
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी आणि बदलत्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा कठीण निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. या कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनिअर्सना बसणार आहे. गुगल किंवा इतर नामांकित टेक कंपन्यांच्या धर्तीवर २०२१ मध्ये हे ‘इंडिया टेक हब’ सुरू करण्यात आले होते. अदिदासच्या जागतिक उत्पादनांसाठी दर्जेदार तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग टॅलेंट विकसित करणे हा यामागील उद्देश होता. मात्र, हब सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांतच कंपनीला हा मोठा बदल करावा लागला आहे.
कर्मचाऱ्यांची दोन गटात विभागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचे दोन गट करण्यात आले आहे. पहिल्या गटातील कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी (१५ सप्टेंबर) कपातीची घोषणा करण्यात आली, त्याच दिवशी त्यांचे एक्झिट लेटर्स देण्यात आले आहे, तर दुसऱ्या गटातील कर्मचारी १५ डिसेंबरपर्यंत कामावर राहणार आहेत.
कंपनीची अधिकृत प्रतिक्रिया काय?
“व्यवसायाच्या बदलत्या गरजांनुसार कार्यपद्धती अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान विभागातील काही पदे कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा बदल आमच्या दीर्घकालीन यशासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे ऋणी असून, या कठीण काळात त्यांना सर्वतोपरी मदत आणि ट्रान्झिशन असिस्टन्स दिले जाईल.”
भारतीय बाजारावर काय परिणाम होईल?
अदिदासने जरी भारताला महत्त्वाची बाजारपेठ म्हटले असले, तरी गुडगावमधील टेक हबमधील निम्म्या कर्मचाऱ्यांना एकाच झटक्यात काढल्यामुळे टेक इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. जागतिक स्तरावर कंपन्या आता आपल्या टेक खर्चात कपात करत असून, त्याचाच एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
