Adobe New CEO Anil Chakravarthy : जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय नेतृत्वाची चमक कायमच पाहायला मिळतो. काही महिन्यांपूर्वीच व्हॉट्सॲपच्या सीईओपदी भारतीय कुणाल शाह यांनीच नियुक्ती करण्यात आली. यात आता आणखी एका नावाचा समावेश होणार आहे. भारतीय वंशाचे अनिल चक्रवर्ती यांची डिझाइन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘अॅडोब’चे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते याच कंपनीत ‘कस्टमर एक्सपिरिअन्स ऑर्केस्ट्रेशन’ विभागाचे प्रमुख होते.
विशेष म्हणजे ते एका भारतीयाचीच जागा घेत आहेत. गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ अॅडोबचे यशस्वी नेतृत्व करणारे शंतनू नारायण १ डिसेंबर २०२६ रोजी सीईओ पदावरून पायउतार होणार आहेत. ते आता कंपनीचे ‘एक्झिक्युटिव्ह चेअर’ या भूमिकेत दिसतील.
एआय… अनिल चक्रवर्ती यांच्यासमोरचं मोठं आव्हान
सध्या डिझाइन सॉफ्टवेअर क्षेत्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘एजंटिक एआय’ने धुमाकूळ घातला आहे. ‘कॅनव्हा’ सारखे एआय-आधारित प्रतिस्पर्धी आणि ओपनएआय व अँथ्रॉपिक सारख्या एआय रिसर्च लॅब्जने अॅडोबसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. अशा कठीण परिस्थितीत अॅडोबचे नेतृत्व करण्याची जबाबदारी अनिल चक्रवर्ती यांच्या खांद्यावर आली आहे.
शंतनू नारायण यांचा चक्रवर्तींवर पूर्ण विश्वास
“अॅडोबची पुढील वाटचाल आणि संधी अमर्याद आहेत. अनिल हे एक अनुभवी आणि अॅडोबच्या व्यवसायाची सखोल समज असलेली व्यक्ती आहे. त्यांनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन उत्पादने तयार करून दाखवली आहेत. एआयच्या या नव्या युगात अॅडोबला विकासाच्या पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी अनिल चक्रवर्ती हेच योग्य व्यक्ती आहेत, याचा मला पूर्ण विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया मावळते सीईओ शंतनू नारायण यांनी दिली.
डेव्हिड वाधवानी अॅडोब सोडणार
सीईओ पदाच्या शर्यतीत चक्रवर्ती यांच्यासोबत अॅडोबच्या क्रिएटिव्हिटी आणि प्रॉडक्टिव्हिटी व्यवसायाचे प्रमुख डेव्हिड वाधवानी प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, या मोठ्या बदलाबद्दल माहिती मिळताच त्यांनी अॅडोबमधील आपली १५ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द संपवून कंपनी सोडण्याची घोषणा केली आहे.
वाराणसीसोबत खास नातं
अनिल चक्रवर्ती यांनी आयआयटी वाराणसीमधून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले आहे, पुढी शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. येथील जगप्रसिद्ध मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एम.एस. आणि पीएच.डी. संपादन केली आहे.
अनिल चक्रवर्तींची कारकीर्द
जानेवारी २०२० मध्ये अॅडोबमध्ये रुजू झाल्यानंतर चक्रवर्ती यांनी डिजिटल एक्सपिरिअन्स आणि ग्लोबल फील्ड ऑपरेशन्सचे यशस्वी नेतृत्व केले. अॅडोबच्या CX Enterprise, GenStudio, आणि Brand Visibility यांसारख्या एआय-संचालित प्रॉडक्ट्सच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय ‘वर्कफ्रंट’ आणि ‘सेमरश’ या कंपन्यांचे अॅडोबमध्ये विलीनीकरण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अनिल चक्रवर्ती काय म्हणाले?
“क्रिएटिव्हिटी, प्रॉडक्टिव्हिटी आणि कस्टमर एक्सपिरिअन्सच्या ‘एजंटिक सॉफ्टवेअर’ युगात अॅडोबचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. अॅडोबचा इतिहास हा केवळ तंत्रज्ञानाने नव्हे, तर माणसांनी आणि ग्राहकांशी असलेल्या कटिबद्धतेने भविष्य घडवण्याचा राहिला आहे,” अशी प्रतिक्रिया अनिल चक्रवर्ती यांनी दिली.
