AI existential threat hype Vineet Nayar opinion overview: एआय नियंत्रणाबाहेर जाऊन मानवजातीला धोका निर्माण करू शकते, हा इशारा म्हणजे उद्योगक्षेत्राने निर्माण केलेल्या अतिशयोक्तीचाच एक भाग आहे, असे एचसीएलचे माजी सीईओ विनीत नायर यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान अस्तित्वासाठी धोका बनू शकते, असा एआय संशोधकांचा दावा त्यांनी फेटाळून लावला.
नायर म्हणाले की, एआय उद्योगक्षेत्राने या तंत्रज्ञानाच्या क्षमतेबाबत वारंवार मोठे दावे केले आहेत. यामध्ये एआय मानवापेक्षा अधिक हुशार असण्यापासून ते नोकऱ्या हिरावून घेण्यापर्यंत आणि आता संभाव्यपणे मानवाचा जीव घेण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे.
“आम्ही लहानाचे मोठे होत असताना, ‘वाघ आला, वाघ आला’ पण प्रत्यक्षात वाघ कधीच आला नाही अशी ती गोष्ट तुम्ही नक्कीच ऐकली असेल. गेल्या काही वर्षांत लोकांच्या माथी कोणती भ्रामक कल्पना मारली जात आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. ती कल्पना अशी होती की, एआय हे मानवापेक्षा अधिक बुद्धिमान आहे. एआय लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेणार आहे आणि आता तर एआय आपला जीवच घेणार आहे”, असे नायर यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना म्हटले.
आघाडीची एआय कंपनी अँथ्रोपिकमधील संशोधक जेकब कॉक्सन यांनी एआयबाबत चिंता व्यक्त करत राजीनामा दिला होता. कॉक्सन यांचे म्हणणे होते की, या दशकाच्या अखेरीस एआयमुळे मानवजात नष्ट होऊ शकते, अशी धारणा असूनही लोक एआय विकसित करत आहेत.
एचसीएलचे माजी सीईओ नायर यांनी सांगितले की, ते एआयचे मोठे चाहते आहेत आणि ते भविष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांपैकी एक ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र, एआय मानवांना मागे टाकून त्यांना आपल्या अधीन करेल किंवा ते मानवजातीचा विनाश करेल, या दोन्ही कल्पना त्यांनी फेटाळून लावल्या.
मी एआयचा मोठा चाहता…
“मी एआयचा मोठा चाहता असलो, तरी सध्या या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष कामगिरी त्याच्याबद्दलच्या अपेक्षांच्या तुलनेत मागेच आहे”, असेही नायर यांनी नमूद केले.
त्यांनी असा युक्तिवाद केला की, या क्षेत्रातील ‘हायप सायकल’ कंपन्यांना अशा भविष्याची विक्री करण्यास मदत करत आहे, जे अजून प्रत्यक्षात आलेले नाही. नायर म्हणाले, “या ‘हायप सायकल’चा आलेख उंचावत आहे आणि त्याद्वारे कंपन्या आपल्याला एक अशी गोष्ट विकत आहेत, जिच्यात अशा गोष्टींचे आश्वासन दिले जात आहे ज्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही, पण भविष्यात ती केली जाईल.”
