Block Inc layoffs 4000 employees: गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील असंख्य कर्मचाऱ्यांना एआयमुळे नोकरी जाण्याची चिंता भेडसावत आहे. अशात आता स्क्वेअर, कॅश अॅप आणि आफ्टरपे यांची पालक कंपनी ब्लॉकने सुमारे ४०% कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ४,००० हून अधिक लोकांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे. यामुळे ब्लॉकच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १०,००० हून कमी होऊन ६,००० च्या खाली येईल.
कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी यांच्या मते, “इंटेलिजन्स टूल्स”ची वाढ हे या नोकरकपातीमागील महत्त्वाचे कारण आहे. गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात डोर्सी यांनी स्पष्ट केले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कंपनीच्या कामाच्या पद्धती आणि कंपनीला किती लोकांची आवश्यकता आहे हे बदलत आहे.
ब्लॉकच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला असला तरी, सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे या नोकरकपातीची बातमी आल्यानंतर काही तासांतच ब्लॉकचे शेअर्स सुमारे २५% पर्यंत वाढले. हा निर्णय सध्या कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नोकऱ्या कपातींपैकी एक आहे.
सीएनबीसीच्या मते, कर्मचारी कमी केल्याने कंपनीला ४५० दशलक्ष डॉलर्स ते ५०० दशलक्ष डॉलर्स दरम्यान नुकसान होईल. सिक्युरिटीज फाइलिंगनुसार, यातील बहुतेक रक्कम सेव्हरन्स पेमेंट, कर्मचारी फायदे आणि शेअर व्हेस्टिंगशी संबंधित नॉन-कॅश खर्चासाठी जाईल. ब्लॉकने म्हटले आहे की यापैकी बहुतेक पुनर्रचना खर्च पहिल्या तिमाहीत नोंदवले जातील अशी अपेक्षा आहे.
गुंतवणूकदारकांना लिहिलेल्या पत्रात, ब्लॉकचे सह-संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी यांनी म्हटले आहे की, “आज आम्ही आमच्या काही कर्मचाऱ्यांना एक कठीण निर्णय घेत असल्याची माहिती दिली आहे. आम्ही ब्लॉकची कर्मचारी संख्या जवळजवळ निम्म्याने कमी करत आहोत. ती १०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांवरून ६,००० पेक्षा कमी कर्मचाऱ्यांपर्यंत आणत आहोत, याचा अर्थ ४,००० हून अधिक लोकांना काम सोडण्यास सांगितले आहे.” कंपनीच्या वार्षिक फाइलिंगनुसार, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जगभरात ब्लॉकचे १०,२०५ कर्मचारी होते.
या निर्णयामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी डॉर्सी म्हणाले, “सर्वात आधी, जर तुम्ही प्रभावित झालेल्या व्यक्तींपैकी एक असाल, तर तुम्हाला २० आठवड्यांचा पगार अधिक नोकरीच्या प्रत्येक वर्षासाठी १ वाढीव आठवड्याचा पगार, मे महिन्याच्या अखेरपर्यंतचे इक्विटी शेअर्स, ६ महिन्यांचा आरोग्य विमा, तुमचे कॉर्पोरेट डिव्हाइसेस आणि या कठीण काळात मदतीसाठी ५,००० डॉलर्स मिळतील. जर तुम्ही अमेरिकेबाहेर असाल, तर तुम्हाला अशीच मदत मिळेल, पण स्थानिक नियमांनुसार त्यातील तपशील वेगळे असू शकतात. इतर कशाच्याही आधी मला तुम्हाला हे सांगायचे आहे.”

