मुंबई : कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वाढता वापर आता केवळ क्लाऊड किंवा डेटा सेंटरपुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट संगणक आणि इतर उपकरणांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे आगामी काळात एआय-सक्षम संगणकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असून, २०२८पर्यंत जवळपास ९८ टक्के पीसी एआय-सक्षम असतील, असा अंदाज डेल टेक्नॉलॉजीज इंडियाचे सीनियर डायरेक्टर आणि जनरल मॅनेजर, क्लायंट सोल्युशन्स ग्रुप, इंद्रजीत बेलगुंडी यांनी व्यक्त केला.

कोविडनंतर काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. कर्मचारी कोणत्याही ठिकाणाहून आणि कोणत्याही वेळी काम करू शकतात. त्यामुळे संगणक हा केवळ माहिती प्रक्रिया करणारे उपकरण न राहता उत्पादकता, सर्जनशीलता आणि निर्णयक्षमतेचे महत्त्वाचे साधन बनला आहे. याच पार्श्वभूमीवर एआयची क्षमता थेट पीसीमध्ये उपलब्ध करून देण्याकडे कंपन्यांचा कल वाढत असल्याचे बेलगुंडी यांनी सांगितले.

एआय क्लाऊडमधून थेट उपकरणांमध्ये

एआयशी संबंधित अनेक प्रक्रिया आतापर्यंत क्लाऊड आणि डेटा सेंटरमध्ये केल्या जात होत्या. मात्र आता त्यातील काही प्रक्रिया थेट उपकरणांवर करण्याकडे कल वाढत आहे. याला ‘एज एआय’ किंवा ‘एज कम्प्युटिंग’चा वाढता वापर कारणीभूत ठरत आहे. एआय पीसीमध्ये सीपीयू, जीपीयू आणि एनपीयू यांचा एकत्रित वापर केला जातो. विशेषतः एनपीयू म्हणजेच ‘न्यूरल प्रोसेसिंग युनिट’ हे एआयशी संबंधित कामे अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी तयार केलेले असते. त्यामुळे काही एआय प्रक्रिया थेट संगणकावरच करता येतात. यामुळे वेग वाढण्याबरोबरच डेटा गोपनीयता आणि सुरक्षेलाही मदत होऊ शकते.

तीनपैकी दोन वापरकर्ते एआयचा वापर करतात

भारत आणि एपीएसी क्षेत्रातील वापरकर्त्यांच्या अभ्यासाचा संदर्भ देताना बेलगुंडी यांनी सांगितले की, चारपैकी जवळपास तीन वापरकर्ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एआयचा वापर करीत आहेत. विशेष म्हणजे एआयचा वापर केवळ तरुणांपुरता मर्यादित नसून जनरेशन झेड, मिलेनियल्स तसेच त्यापेक्षा अधिक वयाच्या वापरकर्त्यांमध्येही तो वाढत आहे. भारतामध्ये एआयचा वापर करणाऱ्या संस्था आणि वापरकर्त्यांचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. अनेक संस्थांनी एआयची अंमलबजावणी सुरू केली असून, काही संस्था प्रयोग आणि पायलट प्रकल्पांच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे एआयचा वापर आता ‘प्रयोग’ या टप्प्यातून प्रत्यक्ष व्यावसायिक वापराच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे.

उत्पादकतेत ३० टक्क्यांहून अधिक वाढ शक्य

एआय पीसीचा सर्वात मोठा फायदा उत्पादकता वाढण्यात होऊ शकतो. संस्थेमध्ये ५० टक्क्यांहून अधिक एआय पीसीचा वापर असल्यास, प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज सुमारे २.१७ तासांची बचत होऊ शकते. त्यामुळे एकूण उत्पादकतेमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
ई-मेल तयार करणे, कागदपत्रांचे विश्लेषण, माहिती शोधणे, बैठकींचे सारांश तयार करणे, डेटा विश्लेषण, सादरीकरणे तयार करणे तसेच विविध प्रकारच्या सर्जनशील कामांमध्ये एआयचा वापर वाढत आहे.

बँकिंगपासून संशोधनापर्यंत वापर

एआय पीसीचा वापर केवळ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. आयटी आणि आयटीईएस, आयटी ऑपरेशन्स, वित्त व लेखा, बँकिंग आणि वित्तीय सेवा, संशोधन व विकास, पुरवठा साखळी आणि सुरक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढत आहे. विशेषतः जनरेटिव्ह एआयच्या वाढत्या वापरामुळे संगणकांमध्ये स्थानिक पातळीवर एआय प्रक्रिया करण्याची क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. जवळपास पाचपैकी चार संस्थांना एआय पीसीमुळे त्यांच्या संस्थेतील एआयचा स्वीकार आणखी वेगाने होईल, असे वाटत असल्याचे बेलगुंडी यांनी नमूद केले.

डेटा सुरक्षा आणि गोपनीयता महत्त्वाची

एआयचा वापर वाढत असताना कंपन्यांसमोर डेटा सार्वभौमत्व, नियामक अनुपालन, सुरक्षा, गोपनीयता आणि एआय गव्हर्नन्स ही महत्त्वाची आव्हाने असतील. संवेदनशील माहिती सतत क्लाऊडवर पाठवण्याऐवजी काही प्रक्रिया उपकरणावरच करता आल्यास संस्थांना डेटा नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे भविष्यात एआय पीसी निवडताना केवळ प्रोसेसरची क्षमता किंवा संगणकाचा वेग महत्त्वाचा राहणार नाही. सुरक्षा, ऊर्जा कार्यक्षमता, एआय प्रक्रिया करण्याची क्षमता आणि संबंधित सॉफ्टवेअरचा इकोसिस्टीम हे घटकही महत्त्वाचे ठरणार आहेत.

‘एआय’ हा केवळ चर्चेचा विषय न राहता व्यावसायिक परिणाम देणारे साधन

एआयबाबत सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत असली तरी त्याचा खरा फायदा व्यवसायाच्या परिणामांमध्ये दिसणे आवश्यक आहे. उत्पादकता वाढवणे, निर्णय घेण्याचा वेग वाढवणे आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचवणे यासारखे प्रत्यक्ष परिणाम एआयच्या यशाचे मोजमाप ठरतील. एआयचा प्रवास आता डेटा सेंटर आणि क्लाऊडपासून एज डिव्हाइस, पीसी आणि वर्कस्टेशनपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात एआय पीसी हे अतिरिक्त सुविधा असलेले उपकरण न राहता संस्थांच्या दैनंदिन कामकाजाचा महत्त्वाचा भाग बनण्याची शक्यता आहे.