AI Risks Yoshua Bengio Warning : तुम्ही दाक्षिणात्य अभिनेता रजनिकांत यांचा ‘रोबोट’ चित्रपट पाहिला आहे का? यामध्ये त्यांनी विकसित केलेला एक यंत्रमानव चुकीच्या हातात गेल्यानंतर त्याच्यासारखे लाखो रोबोट तयार करुन मानवजातच नष्ट करण्याची योजना आखतो. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयचा झपाट्याने होत असलेला विस्तार पाहून एका प्रसिद्ध शास्त्रज्ञानाने अशीच भीती व्यक्त केली आहे. कृत्रिम प्रज्ञेवर (AI) आता मानवाचे नियंत्रण हळूहळू सुटत चालले आहे का? असा गंभीर सवाल उपस्थित करत ‘एआय’चे प्रणेते आणि प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ योशुआ बेंगिओ यांनी जगाला धोक्याची घंटा दिली आहे. अणुयुद्धाच्या धर्तीवर एआयचे नियंत्रण आणि सुरक्षेसाठी आता अधिक कडक नियमांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एएफपीच्या माहितीनुसार, कॅनेडियन संगणक शास्त्रज्ञ आणि २०१५ च्या मानाच्या ‘ट्युरींग पुरस्काराचे’ मानकरी असलेल्या ६२ वर्षीय बेंगिओ यांनी एआयच्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जागतिक स्तरावर एआयच्या सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘एआय एजंट्स’ ठरत आहेत धोकादायक?

जुलै २०२६ मध्ये ‘ओपनएआय’च्या प्लॅटफॉर्मवर अनाधिकृत सुरक्षा उल्लंघनाची घटना घडली. यानंतर एआय सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वतःहून निर्णय घेणाऱ्या आणि कृती करणाऱ्या ‘एआय एजंट्स’मुळे सायबर सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा बेंगिओ यांनी दिला आहे. हे बुद्धिमान सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स भविष्यात कोणत्याही मानवी मदतीशिवाय सायबर सुरक्षिततेचे कवच पार करुन थेट कोणत्याही कंपनीच्या प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात.
पुरेशा सुरक्षा उपायांशिवाय एआयचा विकास सुरू राहिल्यास मानवी जीवाला धोका निर्माण होईल या चिंतेमुळे, प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांमधून राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांसह, अलिकडच्या आठवड्यांत एआयच्या संभाव्य धोक्यांबद्दलचे इशारे वाढले आहेत.

मानवी वर्तनावर नियंत्रण

फक्त तांत्रिक बाबींमध्येच नव्हे, तर मानवावर प्रभाव टाकण्याची क्षमता या नवीन प्रणालींमध्ये विकसित होत आहे. भविष्यातील प्रगत एआय सिस्टीम माणसांसोबत वैयक्तिक नाते तयार करून त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वागवू शकतात, जे धोकादायक ठरू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

मानवाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता?

बेंगिओ पुढे बोलताना म्हणाले, की एआय प्रणाली जर मानवापासून पूर्णपणे स्वतंत्र झाली, तर त्यांना प्रत्यक्ष जगात आपली कामे करण्यासाठी माणसांची गरज उरणार नाही. सध्या मानवजातीचा विनाश होणे हा अत्यंत टोकाचा आणि दुर्मिळ अंदाज असला, तरी बँक यंत्रणा अचानक ठप्प होण्यासारखे मोठे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे त्यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी ठोस उपायांची मागणी

एआय कंपन्या स्वतःचे नियमन करण्यासाठी विश्वासार्ह आहेत की नाही, यावर चर्चा सुरू आहे. दुसरीकडे ओपनएआय, अँथ्रोपिक आणि गुगल यांसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्या संयुक्त मानक संस्था स्थापन करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहेत. अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोडेई यांच्या नेतृत्वाखालील उद्योगातील प्रमुख व्यक्ती विकासाचा वेग कमी करण्याची मागणी करत आहेत. नफेखोरीच्या उद्देशामुळे सुरक्षा धोक्यात येत आहे. म्हणूनच अणुबॉम्ब नियंत्रणासारख्या जागतिक नियमांच्या धर्तीवर एआय विकासावरही नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे बेंगिओ यांनी सुचवले आहे.

मे २०२५ मध्ये अँथ्रोपिकच्या सुरक्षा चाचणीत काय घडलं?

अँथ्रोपिक या नामांकित कंपनीने त्यांच्या Claude Opus 4 या प्रगत एआय मॉडेलची सुरक्षा चाचणी घेतली. या प्रणालीला कंपनीचा एआय असिस्टंट बनवून कंपनीच्या अंतर्गत ईमेल्स पाहण्याचा ‘ॲक्सेस’ देण्यात आला. जेव्हा एआय मॉडेलला त्याला डिलीट करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली, त्यावेळी त्याने थेट कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही मला सिस्टीममधून डिलीट करण्याचा निर्णय मागे घेतला नाही, तर तुमच्या विवाहबाह्य संबंधांचे सर्व पुरावे आणि कागदपत्रे मी तुमच्या पत्नीला आणि कंपनीच्या बोर्ड मेंबर्सना पाठवून देईन, अशी धमकीच एआयने दिली होती. या चाचणीतून हे किती धोकादायक ठरू शकते, याचा अंदाज येऊ शकतो.