AI vs Traditional IT Salary India: भारतातील आयटी क्षेत्रातील नोकरी बाजारपेठेत अनुभवापेक्षा एआयमध्ये विशेष कौशल्ये असलेल्या उमेदवारांना कंपन्या प्राधान्य देत असल्याची माहिती १ फायनान्स रिसर्चच्या एका नीन अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार, कंपन्या एआय कौशल्याला अधिक पसंती देत आहेत. तसेच नियमित आयटी नोकऱ्यांपेक्षा एआय संबंधित पदासांसाठी जास्त पगार दिला जात आहे. यातून आता असे दिसून येत आहे की, या क्षेत्रात आता अनुभवापेक्षा एआय कौशल्यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.
या अहवालात मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद आणि बंगळूरु येथील ९५० नोकरीच्या जाहिरातींचे विश्लेषण करण्यात आले असून, त्यात असे आढळून आले आहे की, पारंपरिक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातील समान पदांच्या तुलनेत एआय कौशल्ये असलेल्यांना जास्त पगार मिळत आहे.
अहवालानुसार, करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर पारंपारिक आयटी पदांच्या तुलनेत एआय संबंधित पदांवरील कर्मचाऱ्यांना अधिक वेतन मिळते. ० ते ३ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना एआय क्षेत्रातील पदांसाठी वार्षिक सरासरी ६ लाख रुपये पगार मिळतो, तर पारंपारिक आयटी नोकऱ्यांमध्ये हा पगार ५ लाख रुपये आहे.
अनुभवासोबत ही तफावत अधिक वाढत जाते. ३ ते ५ वर्षांचा अनुभव असलेल्या एआय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पगार १२ लाख रुपये आहे, तर पारंपरिक आयटी क्षेत्रात तो ९ लाख रुपये आहे. तसेच एआय क्षेत्रातील ५ ते १० वर्षांचा अनुभव असलेल्यांना २२ लाख रुपये तर पारंपारिक आयटी कर्मचाऱ्यांना याच अनुभवासाठी १७ लाख रुपये पगार मिळत आहे.
वरिष्ठ स्तरावर, १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले एआय क्षेत्रातील कर्मचारी सरासरी ३६ लाख रुपये वार्षिक कमावतात, तर पारंपरिक आयटी क्षेत्रात हे उत्पन्न २६ लाख रुपये आहे. म्हणजेच एआय क्षेत्रातील पगार ३८ टक्क्यांनी जास्त आहे.
अहवालात असेही दिसून आले आहे की, अनुभवी एआय तज्ज्ञ ७० लाख रुपयांपर्यंतचे पगार मिळवू शकतात. याउलट, अनेक पारंपरिक आयटी पदांवरील कर्मचाऱ्यांचा पगार साधारणपणे २३ लाख ते ५८ लाख रुपयांच्या दरम्यान स्थिरावतो.
अनुभवापैक्षा कौशल्याला महत्त्व
गेल्या अनेक दशकांपासून, भारतातील आयटी क्षेत्रातील करिअरमधील प्रगती मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठतेवर अवलंबून होती. अहवालात असा युक्तिवाद केला आहे की, हे समीकरण बदलत आहे, कारण कंपन्या पारंपरिक आयटी क्षेत्रातील अनुभवापेक्षा विशेष एआय कौशल्ये असलेल्यांना अधिक महत्त्व देत आहेत.
