Anthropic AI Bengaluru Office Opening News: अँथ्रॉपिक या एआय कंपनीने काही दिवसांपूर्वी नवीन प्लगइन्स लॉन्च केले आहेत. ज्यामुळे जगभरातील आयटी कंपन्यांसह भारतीय आयटी कंपन्यांनाही जोरदार फटका बसू लागला आहे. अँथ्रॉपिकने नवे प्लगइन्स लॉन्च केल्यापासून भारतीय आयटी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळू लागले आहेत.

अशात अँथ्रॉपिक कंपनीने बेंगळुरूमध्ये आपले कार्यालय सुरू केले आहे. कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राहुल पाटील यांनी कंपनीच्या शहरातील कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर बोलताना राहुल पाटील यांनी बेंगळुरूतील त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आणि नमूद केले की, भारतात अशक्य गोष्टीही शक्य आहेत.

१६ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू कार्यालयाच्या उद्घाटनानंतर राहुल पाटील म्हणाले की, “भारतात अशक्य गोष्टीही शक्य आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की त्यांनी बेंगळुरूतील बाल्डविन स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे आणि सेंट जोसेफ विद्यापीठातून पदवी घेतली आहे.

“पीपल्स एज्युकेशन सोसायटी विद्यापीठ खूप कडक आहे. मी माझ्या पत्नीला अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात भेटलो होतो”, असे राहुल पाटील यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पाटील यांनी बेंगळुरूच्या पीईएस विद्यापीठातून संगणक शास्त्रात पदवी घेतली आहे. पुढे त्यांनी अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून एमबीए केले आहे.

त्यांनी सांगितले की, पुढील १०० वर्षांत एआय ही कदाचित सर्वात परिवर्तनकारी गोष्ट असेल, असे त्यांचे मत आहे. ज्यामुळे ते या मार्गावर येण्यास प्रवृत्त झाले.

ऑक्टोबर २०२५ मध्ये अँथ्रॉपिकने टेक इन्फ्रास्ट्रक्चरमधील अनुभवी व्यक्ती असलेल्या भारतीय वंशाच्या राहुल पाटील यांची त्यांच्या सीटीओपदी नियुक्ती केली होती. एआय संशोधन कंपनी अँथ्रॉपिक ओपनएआय, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांच्याशी वाढत असलेल्या स्पर्धेत आपल्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचा विचार करत आहे.

राहुल पाटील यांची भूमिका काय आहे?

येत्या काळात राहुल पाटील कंपनीच्या अभियांत्रिकी कामकाजाचे नेतृत्व करणार आहेत, ज्यामध्ये उत्पादने, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यांचा समावेश आहे. काही दिवसांत ते सह-संस्थापक सॅम मॅककँडलिश यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

कंपनीचे निवदेन

आपल्या निवेदनात अँथ्रोपिकने म्हटले आहे की, “Claude.ai साठी भारत ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतात क्लॉडच्या वापराच्या निम्मा वापर संगणक आणि गणितीय कामांसाठी केला जातो. ज्यामध्ये अॅप्लिकेशन्स तयार करणे, प्रणालींचे आधुनिकीकरण करणे आणि उत्पादन सॉफ्टवेअर शिपिंग करणे यांचा समावेश आहे.”

त्यामध्ये पुढे म्हटेल आहे की, “आज आम्ही अधिकृतपणे आमचे बेंगळुरू कार्यालय उघडत असताना, आम्ही उद्योग, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील भागीदारी जाहीर करत आहोत.”