जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी ‘ॲपल’ने (Apple) आपल्या नवीन नेतृत्वाच्या पगाराचा अधिकृत खुलासा केला आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर CEO पदावरून पायउतार झालेले आणि आता कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी विराजमान झालेले टिम कुक (Tim Cook) यांना वर्षाला ४७ दशलक्ष डॉलर (सुमारे ४०४ कोटी रुपये) मानधन मिळणार आहे. ॲपलने अमेरिकेच्या ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’कडे दाखल केलेल्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

नवीन CEO जॉन टर्नस यांचं वेतन गणित कसं आहे?

ॲपलच्या हार्डवेअर अभियांत्रिकी विभागाचे माजी प्रमुख राहिलेल्या जॉन टर्नस यांना पदोन्नतीसोबत मोठे आर्थिक पॅकेज मिळणार आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी ॲपलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाची धुरा सांभाळणाऱ्या जॉन टर्नस (John Ternus) यांना पुढील आर्थिक वर्षात सुमारे ५८ दशलक्ष डॉलर (भारतीय चलनानुसार सुमारे ५०० कोटी रुपये) मिळतील.

  • मूळ वेतन (Base Salary): प्रतिवर्ष ३ दशलक्ष डॉलर (सुमारे २५.८ कोटी रुपये).
  • स्टॉक शेअर्स (Stock Awards): आर्थिक वर्ष २०२७ साठी तब्बल ५५ दशलक्ष डॉलर (सुमारे ४७३ कोटी रुपये) मूल्याचे शेअर्स.
  • कामगिरीवर आधारित शेअर्स: ५५ दशलक्ष डॉलरपैकी ७५ टक्के शेअर्स हे ॲपलच्या S&P 500 निर्देशांकातील कामगिरीवर अवलंबून असतील. तर उर्वरित २५ टक्के शेअर्स टर्नस यांना पुढील चार वर्षांत दर सहा महिन्यांनी टप्प्याटप्प्याने दिले जातील.
  • विशेष वन-टाईम बोनस: या आर्थिक वर्षात CEO म्हणून केलेल्या सुरुवातीच्या कामासाठी कंपनी त्यांना २.५ दशलक्ष डॉलरचे अतिरिक्त शेअर्सही देणार आहे.

ॲपलच्या हार्डवेअर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष असताना टर्नस यांना वर्षाला सुमारे २५ दशलक्ष डॉलर (सुमारे २१५ कोटी रुपये) मिळत असल्याचा अंदाज ब्लूमबर्गच्या अहवालात व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे CEOपदी विराजमान होताच त्यांच्या पगारात दुप्पट वाढ झाली आहे.

टिम कुक यांच्या जबाबदारीत बदल, पगार घटला

गेल्या वर्षी ॲपलचे CEO म्हणून काम करताना टिम कुक यांनी ७४.३ दशलक्ष डॉलर (सुमारे ६३९ कोटी रुपये) कमावले होते. यामध्ये मूळ वेतनासह ५७.५ दशलक्ष डॉलरचे शेअर्स, १२ दशलक्ष डॉलरचा रोख बोनस आणि सुरक्षेचा खर्च समाविष्ट होता.

मात्र, आता चेअरमनपदाची भूमिका स्वीकारल्याने त्यांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे:

  • २६ सप्टेंबरपासून कुक यांचे मूळ वेतन वर्षाला २ दशलक्ष डॉलर (सुमारे १७.२ कोटी रुपये) असेल.
  • त्यांना ४५ दशलक्ष डॉलरचे शेअर्स मिळतील, जे कामगिरी आणि वेळेच्या अटींवर समान (५०-५०%) विभागलेले असतील.
  • विशेष सवलत: अहवालानुसार, कुक यांनी शेअर्स मिळाल्याच्या पहिल्या वर्षानंतर जरी निवृत्ती घेतली, तरी त्यांचे उर्वरित शेअर्स रद्द होणार नाहीत. सामान्यतः कंपनी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचे न मिळालेले शेअर्स रद्द होतात; परंतु कुक यांच्या बाबतीत हा नियम शिथिल करण्यात आला आहे.

१५ वर्षांचा ऐतिहासिक प्रवास अन् ५ ट्रिलियन डॉलरचा टप्पा

चालू शतकात ॲपलने दुसऱ्यांदाच आपला CEO बदलला आहे. ऑगस्ट २०११ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्याकडून टिम कुक यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली होती.

कुक यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात ॲपलचे बाजारमूल्य ३५० अब्ज डॉलरवरून थेट ५ ट्रिलियन डॉलरच्या (सुमारे ४३० लाख कोटी रुपये) ऐतिहासिक टप्प्यापर्यंत पोहोचले. सध्या ॲपलचे बाजारमूल्य सुमारे ४.६ ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे.

जरी टिम कुक यांनी दैनंदिन व्यवस्थापनातून माघार घेतली असली, तरी एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत, चीन आणि अमेरिकेच्या प्रशासनासोबत ॲपलचे राजनैतिक संबंध मजबूत ठेवण्याचे महत्त्वाचे काम पाहणार आहेत.