Foxconn Bangalore Village Dispute: बंगळुरू (ग्रामीण) जिल्ह्यातील देवनाहल्ली तालुक्यात कोइरा ग्रामपंचायत आणि फॉक्सकॉन हॉन हाई टेक्नॉलॉजी इंडिया मेगा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात कर न भरणे, स्थानिक बांधकाम नियमांचे उल्लंघन आणि स्थानिकांना नोकऱ्या नाकारल्याच्या आरोपांवरून मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. फॉक्सकॉन ही कंपनी भारतात विविध कारखान्यांच्या माध्यमातून आयफोनची असेंब्ली करते आणि त्याची निर्यात करते.

ग्रामपंचायतीने फॉक्सकॉनला एक औपचारिक नोटीस बजावली असून, कंपनीला डोड्डगोळ्ळहळ्ळी आणि अरुवनहळ्ळी गावांमध्ये ५.३३ लाख चौरस मीटरवर पसरलेल्या प्रकल्पांसाठी मंजूर बांधकाम आराखडे, बांधकाम परवाने, पूर्तता आणि भोगवटा प्रमाणपत्रे तसेच सर्वेक्षणानुसार बांधकामाच्या क्षेत्राचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ग्रामपंचायतीने म्हटले आहे की, इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन कामकाज सुरू झाले असले तरी, केवळ मोकळ्या जागांचीच माहिती उपलब्ध आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींचा आरोप आहे की, अनेक पत्रव्यवहार आणि बैठका होऊनही फॉक्सकॉनने स्थानिकांना रोजगार दिलेला नाही. उलट स्थानिकांना मुलाखतीसाठी बोलावून बाहेरील लोकांना नोकरीवर घेतले आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कारखान्यांसारख्या इतर आस्थापनांप्रमाणे नियमितपणे कर भरण्यात ही कंपनी अपयशी ठरली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

कर्नाटक ग्राम स्वराज्य आणि पंचायत राज कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देत, पंचायतीने कंपनीला नियमांचे पालन करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर ७ तारखेला परिसरातील हजारो लोकांना सोबत घेऊन मोठा जनआंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

बंगळुरू (ग्रामीण) जिल्ह्यात फॉक्सकॉनमुळे हजारो नोकऱ्या निर्माण होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे मानले जाते. कर्नाटक सरकारने यापूर्वीच मोठ्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. पण हा नवीन वाद कॉर्पोरेट विस्ताराचा आणि स्थानिक नागरिकांच्या अपेक्षांचा समतोल साधण्यातील आव्हाने अधोरेखित करतो.

फॉक्सकॉनबाबत

फॉक्सकॉन कंपनीचे मुख्यालय तैवानमध्ये आहे. ही ॲपल कंपनीच्या आयफोनची सर्वात मोठी पुरवठादार आहे. फॉक्सकॉनने २०१७ मध्ये तामिळनाडूमध्ये भारतातील आपला पहिला कारखाना उभारला होता.

तेव्हापासून, कंपनीने ॲपल आणि शाओमीसारख्या इतर ब्रँड्ससाठी आयफोनच्या असेंब्लीपासून आपला व्यवसाय विस्तारला आहे. या वर्षी मे महिन्यात, फॉक्सकॉनने भारतात पिक्सेल फोन आणि ड्रोनच्या निर्मितीसाठी गुगलसोबत एक करार केला आहे.