Apple Pay launch India : गुगल पे, फोन पे नंतर आता आणखी एका दिग्गज टेक कंपनीने भारताच्या डिजिटल पेमेंट्स मार्केटमध्ये पाऊल ठेवले आहे. ‘ॲपल’ने अखेर आपली बहुप्रतिक्षित ‘ॲपल पे’ (Apple Pay) ही कॉन्टॅक्टलेस पेमेंट सेवा अधिकृतपणे लाँच केली आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे आता आयफोन, आयपॅड आणि ॲपल वॉच वापरणाऱ्यांना वारंवार कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. ॲपलने भारताची प्रमुख खासगी बँक असलेल्या ‘अ‍ॅक्सिस बँक’ सोबत भागीदारी केली आहे.

ॲपल पे सेवा कोणाला वापरता येणार?

ही सेवा सध्या फक्त अ‍ॅक्सिस बँकेच्या व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्ड धारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी काळात यामध्ये आणखी अनेक बँकांचा समावेश केला जाईल, अशी माहिती एका ॲपलच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘मनीकंट्रोल’शी बोलताना दिली आहे.

ग्राहकांसाठी काय आहेत फायदे?

ॲपल पे मुळे युजर्सना पेमेंट करताना कोणताही कार्ड पिन किंवा वन-टाइम पासवर्ड टाकावा लागणार नाही. दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये पेमेंट करताना युजर्सना फक्त आयफोन किंवा ॲपल वॉचच्या साईड/होम बटणावर डबल-क्लिक करावे लागेल. त्यानंतर फेस आयडी, टच आयडी किंवा डिव्हाइस पासकोडद्वारे ऑथेंटिकेशन करून टर्मिनलजवळ डिव्हाइस नेलं की पेमेंट होऊन जाईल. ही सेवा देशभरातील हजारो दुकाने, ऑनलाइन मर्चंट्स तसेच जगभरातील एनएफसी-इनेबल टर्मिनल्सवर वापरता येईल. लवकरच मॅकसाठी देखील याचे सपोर्ट मिळणार आहे.

हेही वाचा
झुकरबर्गचा LIVE डेमो फेल; भारतीय उद्योजकाला दिलं असं उत्तर की, ‘अपयशा’कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल!

सुरक्षा आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य

ॲपलने आपल्या या सेवेमध्ये सुरक्षेला आणि प्रायव्हसीला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. ग्राहकांचे मूळ कार्ड नंबर डिव्हाइसवर किंवा ॲपलच्या सर्व्हरवर सेव्ह केले जात नाहीत आणि ते कोणत्याही दुकानदारासोबत शेअरही केले जात नाहीत. त्याऐवजी, ‘डिव्हाइस अकाउंट नंबर’चा वापर केला जातो, जो एनक्रिप्टेड स्वरूपात डिव्हाइसमधील ‘सिक्योर एलिमेंट’मध्ये सुरक्षित ठेवला जातो. मास्टरकार्डच्या टोकनायझेशन तंत्रज्ञानामुळे व्यवहारांची सुरक्षितता आणखी वाढवली गेली आहे.

कोणत्या डिव्हाइसवर चालणार?

ही सेवा आयफोन एक्सआर (iPhone XR) किंवा त्यापुढील मॉडेल्स (iOS 18 किंवा नवीन आवृत्ती) वापरता येईल, तर ॲपल वॉचमध्ये सिरिज ६ किंवा त्यापुढील सर्व मॉडेल्सवर वापरता येणार आहे. जागतिक स्तरावर ९० हून अधिक देशांमध्ये आणि ११,००० हून अधिक बँकिंग भागीदारांसोबत सध्या ॲपल पे काम करत आहे.