Apple Intelligence Lawsuit $250 Million Settlement: आयफोन निर्माती कंपनी अॅपलने आपल्या ‘Apple Intelligence’ फिचर्सबाबत युजर्सची दिशाभूल केल्याचा आरोप असलेला एक खटला सामंजस्याने मिटवला आहे. अॅपलने गेल्या वर्षी कॅलिफोर्नियाच्या एका संघीय न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्या भाग म्हणून, २५० दशलक्ष डॉलर्सची (२,३६४.४७ कोटी रुपये) रक्कम देण्यासही सहमती दर्शवली आहे.
कंपनीने वचन दिलेल्या ‘Apple Intelligence’ फिचरमुळे आणि विशेषतः ‘Siri’ च्या नव्या अपडेट संदर्भात, कंपनीला टीकेचा सामना करावा लागला होता. कंपनीने या नव्या अपडेटचे वचन २०२४ मध्ये दिले होते, परंतु हे फिचर प्रत्यक्षात कधीच उपलब्ध झाले नाही.
काय आहे प्रकरण?
एएफपी वृत्तसंस्थेच्या एका वृत्तानुसार, “आयफोनची विक्री वाढवण्याच्या उद्देशाने ॲपलने अशा “एआय (AI) क्षमतांचा प्रचार केला, ज्या त्या वेळी अस्तित्वात नव्हत्या, आजही अस्तित्वात नाहीत आणि पुढील दोन किंवा अधिक वर्षेही अस्तित्वात येणार नाहीत”, असा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला आहे.
आयफोन ग्राहकांना किती पैसे मिळणार?
दरम्यान, बीबीसीच्या एका वृत्तात नमूद करण्यात आले आहे की, जून २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ज्या अमेरिकन ग्राहकांनी आयफोन १५ आणि आयफोन १६ खरेदी केले आहेत, त्यांना ॲपल २५ ते ९५ डॉलर्सची रक्कम (२,३६४.५०रु. ते ८,९८५.१०रु.) अदा करेल.
न्यायाधीशांची मंजुरी मिळणे अद्याप बाकी असलेली ही २५० दशलक्ष डॉलर्सची तडजोड, एखाद्या तंत्रज्ञान कंपनीने केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी तडजोड ठरू शकते. पण, ॲपलने या प्रकरणात आपली कोणतीही चूक मान्य केलेली नाही.
रॉयटर्सला दिलेल्या एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, “दोन अतिरिक्त वैशिष्ट्यांच्या उपलब्धतेशी संबंधित दावे निकाली काढण्यासाठी ॲपलने एका तडजोडीवर सहमती दर्शवली आहे. आम्ही हे प्रकरण मार्गी लावले, जेणेकरून आम्ही ज्या कामात सर्वोत्तम आहोत म्हणजेच आमच्या युजर्सना अत्यंत नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा पुरवणे त्यावरच आमचे लक्ष केंद्रित ठेवू शकू.”
Siri च्या नव्या अपडेटबाबत सध्या काय घडत आहे?
Siri चे नवे अपडेट गेल्या काही वर्षांपासून ॲपलसाठी एक गुंतागुंतीचा विषय बनला आहे. कंपनीने iOS 18 मध्ये ‘Apple Intelligence’ च्या इतर वैशिष्ट्यांसह हे नवीन अपडेट सादर करण्याची योजना आखली होती. मात्र, त्यानंतर यात अनेकदा विलंब झाला असून, या वैशिष्ट्यांवर काम करणाऱ्या टीममधून कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची (राजीनामा देण्याची) मालिकाही सुरू झाली आहे.
