Arvind KC Appointed Chief People Officer OpenAI: चॅटजीपीटीची पालक कंपनी असलेल्या ओपनए आयने भारतीय वंशाचे अरविंद केसी यांची ‘चीफ पीपल ऑफिसर’ म्हणून नियुक्ती केली आहे. अरविंद केसी यांच्याकडे कंपनीतील भरती प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्याची आणि वेगाने होणाऱ्या एआय विस्ताराच्या दिशेने कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असेल.
इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अरविंद केसी यांनी सांता क्लारा विद्यापीठातून एम.बी.ए. आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली आहे.
कंपनीची वाढ होत असताना कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आणि त्यांना मिळणारा पाठिंबा कशा प्रकारे असेल, याला आकार देण्याची जबाबदारी अरविंद केसी यांच्यावर असेल. यामध्ये भरती, ऑनबोर्डिंगपासून ते टीम्सना कार्यक्षमतेने संवाद साधण्यास मदत करणारी धोरणे विकसित करण्यापर्यंतच्या कामांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ते कंपनीला एआय क्षेत्रातील बदलांदरम्यान जबाबदारीने वाटचाल करण्यासही मदत करतील.
ओपनएआयने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की तंत्रज्ञानासोबत कर्मचाऱ्यांचीही प्रगती व्हावी, यासाठी ते त्यांच्या प्रशिक्षण आणि विकासावर सक्रियपणे गुंतवणूक करत आहेत.
“आज प्रत्येक कंपनीला काम कसे होते, टीम्सना कशाची गरज आहे, लोकांचा विकास कसा होतो आणि साधनांमध्ये बदल होत असताना स्वतःला कसे जुळवून घ्यावे, याचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले जात आहे. या प्रश्नांवर काम करत असताना आणि भविष्याची उभारणी करणाऱ्या आमच्या युजर्स, ग्राहक आणि भागीदारांच्या इकोसिस्टमसोबत काम करताना ओपनएआयमध्ये सहभागी होताना मला आनंद होत आहे”, असे अरविंद केसी यांनी म्हटले आहे.
अरविंद केसी कोण आहेत?
भारतीय वंशाचे अरविंद केसी यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव असून त्यांनी सांता क्लारा विद्यापीठातून एम.बी.ए. आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली आहे.
अरविंद केसी यांनी जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये अंतर्गत उत्पादन विकास, आयटी, माहिती सुरक्षा आणि इंजिनीअरिंग टीम्सचे नेतृत्व केले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सेमीकंडक्टर उद्योगातील सप्लाय चेन सिस्टिम्समधून केली आहे.
अरविंद केसी हे अमेरिकेतील सूचीबद्ध गेमिंग प्लॅटफॉर्म रोब्लॉक्समधून ओपनएआयमध्ये सहभागी होत आहेत. रोब्लॉक्समध्ये त्यांनी ‘चीफ पीपल अँड सिस्टम्स ऑफिसर’ म्हणून काम पाहिले आहे. रोब्लॉक्सपूर्वी, अरविंद यांनी गुगल, पलान्टिर टेक्नॉलॉजीज आणि मेटा मध्ये महत्त्वाची पदे भूषवली होती.

