Canva Mass Layoffs AI Impact : एआय आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावर नोकरकपातीची लाट पाहायला मिळत आहे. मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘द वॉल्ट डिस्ने’ कंपनीची नोकरकपातीची बातमी ताजी असतानाच आता आणखी एका जागतिक कंपनीचं नावाची यात भर पडली आहे. ऑस्ट्रेलियातील नामांकित डिझाइन प्लॅटफॉर्म असलेल्या ‘कॅन्व्हा’ कंपनीने तब्बल २२ टक्के म्हणजेच १,२७१ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅन्व्हाच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेलानी पर्किन्स यांनी कंपनीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या एका नोटमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीच्या १३ वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात कठीण क्षण असल्याचे पर्किन्स यांनी म्हटले आहे.
नोकरकपातीचे नेमके कारण काय?
कॅन्व्हा आपल्या डिझाइन सेवेसाठी लोकप्रिय आहे. मात्र, आजकाल एआय तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य लोकही विशेष कौशल्याशिवाय स्वतःहून अनेक गोष्टी करू शकत आहेत. कंपन्यांनाही आता पूर्वीसारख्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज उरलेली नाही. “नवीन तंत्रज्ञानामुळे लोक काय तयार करतात, कसे तयार करतात आणि उत्पादनांकडून त्यांची काय अपेक्षा असते, यात मोठा बदल झाला आहे,” असे मेलानी पर्किन्स यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. “केवळ छोटेफार बदल करून आता भागणार नाही, असा कठीण निष्कर्ष आम्हाला काढावा लागला,” असेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.
गेल्या दशकात पहिल्यांदाच कंपनीच्या वाढीचा वेग मंदावल्यामुळे, कॅन्व्हाला आता अधिक सुटसुटीत आणि छोट्या टीम्सच्या माध्यमातून काम करावे लागणार आहे. यापुढे कंपनीत अंतर्गत विशेष विभागात कपात केली जाणार आहे.
पुनर्रचना आणि कार्यालयाचे नियम कडक
सिडनी हे शहर आता कॅन्व्हाच्या अनेक उत्पादन टीम्ससाठी (Product Teams) मुख्य केंद्र म्हणून काम करेल. येत्या जानेवारीपासून बहुतांश हायब्रिड कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस कार्यालयात येऊन काम करणे बंधनकारक असणार आहे. चेहरा-देखून प्रत्यक्ष संवाद साधण्यावर आता अधिक भर दिला जाईल.
कॅन्व्हाचा थक्क करणारा प्रवास आणि सध्याची आव्हाने
- सन २००८ मध्ये केवळ १९ वर्षांच्या असताना मेलानी पर्किन्स यांनी क्लिफ ओब्रेक्ट यांच्यासह मिळून ‘फ्युजन बुक्स’ हा पहिला डिझाइन प्लॅटफॉर्म सुरू केला होता. त्यानंतर २०१३ मध्ये कॅमेरॉन एडम्स यांच्या सोबतीने त्यांनी ‘कॅन्व्हा’ची स्थापना केली. क्लिष्ट डिझाइन सॉफ्टवेअर्सना फाटा देऊन प्रत्येकाला सहज डिझाईन करता यावे, हा यामागचा उद्देश होता.
- २०२१ मध्ये ४० अब्ज डॉलरवर पोहोचलेले कॅन्व्हाचे मूल्यांकन टेक क्षेत्रातील मंदीमुळे एका वर्षात घसरून सुमारे २६ अब्ज डॉलरवर आले होते. आता संभाव्य आयपीओ किंवा शेअर बाजार लिस्टिंगची तयारी करत असताना, कंपनीला आर्थिक ताळेबंद सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.
