Canva Mass Layoffs Severance Package : सध्या जगभरात कृत्रिम प्रज्ञा आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होताना पाहायला मिळत आहे. जगप्रसिद्ध डिझाईन प्लॅटफॉर्म ‘कॅन्व्हा’ लवकरच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीने आपल्या कार्यपद्धतीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचा फटका तब्बल १,२७१ कर्मचाऱ्यांना बसू शकतो. मात्र, हा निर्णय घेताना कंपनीने कर्मचाऱ्यांचा विचार केला असून त्यांना ६ महिन्यांचा पगार, नवीन नोकरी शोधण्यासाठी मदत, मॅकबुक आणि स्टार्टअपसाठी सुमार १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

निर्णय घेणे खूप कठीण पण…

कॅन्व्हाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेलानी पर्किन्स यांनी एका निवेदनात म्हटलं आहे, की कंपनीच्या १३ वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात कठीण क्षण आहे. पुढे त्यांनी म्हटलं, की तांत्रिक गरजा, वर्कस्पेसच्या बदलत्या प्राथमिकता आणि नव्या स्किल सेट्सनुसार काही बदल करणे आवश्यक आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि भूमिका बदलतील. काहींना ठराविक मोठ्या ऑफिस हब्समध्ये रीलोकेट होण्यास सांगितले जाईल, तर काही कर्मचाऱ्यांना कंपनीतून निरोप घ्यावा लागेल.

टेक जगतातील आजवरचे सर्वात युनिक सेव्हरन्स पॅकेज!

  • कॅन्व्हा कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत असले तरी त्यांनी जाहीर केलेले नुकसान भरपाई पॅकेजचं टेक जगतात कौतुक केलं जात आहे.
  • नोकरीवरून काढण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कमीत कमी ६ महिन्यांचा पगार आणि सर्व कायदेशीर देणी मिळतील.
  • ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीत येऊन १२ महिने झाले नाहीत, त्यांच्यासाठी शेअर्सच्या ‘वेस्टिंग क्लिफ’ची एक वर्षाची अनिवार्य अट रद्द करण्यात आली आहे.
  • ज्या देशांमध्ये आरोग्य विम्याची सुविधा आहे, तिथे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुढील १२ महिन्यांपर्यंत ‘कॅन्हा केअर’ आणि मेडिकल सुविधांचा लाभ मिळत राहील.
  • ऑफिसच्या कामासाठी मिळालेले ‘ॲपल मॅकबुक’ कर्मचाऱ्यांना परत करण्याची गरज नाही, ते सोबत नेऊ शकतात.
  • नवीन नोकरी शोधण्यासाठी १ वर्षाची मोफत लिंक्डइन प्रीमियम मेंबरशिप, प्रोफेशनल करिअर कोचिंग आणि मुलाखतींच्या तयारीसाठी पूर्ण मदत दिली जाईल.

स्टार्टअप सुरू करण्यासाठी मिळणार १०,००० डॉलर्सची आर्थिक मदत!

या संपूर्ण पॅकेजचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत. कॉर्पोरेट नोकरीत पुन्हा जाण्याऐवजी ज्या कर्मचाऱ्यांना स्वतःचा नवीन स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना कॅन्हाकडून १०,००० डॉलर्सची (९.४४ लाख रुपये) मदत केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या मदतीच्या बदल्यात कंपनी नवीन व्यवसायात कोणतीही हिस्सेदारी मागणार नाही.